मॉस्को/किव्ह – रशियाने डोन्बास प्रांतातील हल्ले तीव्र केले असून पिस्की शहरावर ताबा मिळविल्याचा दावा केला आहे. याबरोबरच युक्रेनच्या दक्षिण भागात तैनात केलेले सैन्य रशिया डोम्बास प्रांतात हलविणार असून यामुळे क्षेत्रातील रशियाचा युक्रेनविरोधातील संघर्ष अधिकच तीव्र होणार आहे. अमेरिका व नाटोच्या सदस्यदेशांनी युक्रेनला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरू केला होता. यामुळे युक्रेनची मारकक्षमता वाढून रशियाच्या विरोधात युक्रेनने लष्करी मोहीम तीव्र केली होती. त्यानंतर रशियाच्या लष्करी डावपेचात हा बदल झाल्याचे दिसत आहे.
शनिवारी रशियाने पूर्व युक्रेनमधील डोम्बास प्रांतातील हल्ले अधिकच तीव्र केले. या हल्ल्यांमध्ये रशियाने बाखतम, स्लोव्हियान्स्क व क्रामाटोर्कस् या भागात रॉकेट्स व क्षेपणास्त्रांचा जबरदस्त मारा केला. या हल्ल्यांमध्ये अमेरिका तसेच युरोपिय देशांनी युक्रेनला पुरविलेल्या क्षेपणास्त्र तसेच संरक्षण यंत्रणा नष्ट करण्यात आल्याचा दावा रशियाने केला आहे. त्याचवेळी युक्रेनी लष्कर तसेच युक्रेनी लष्करासाठी लढणारे कंत्राटी जवान यांनाही संपविण्यात आल्याचे रशियाने म्हटले आहे. डोम्बासमधील हल्ल्यांची तीव्रता वाढविण्यासाठी रशियाने दक्षिण युक्रेनमध्ये तैनात केलेली लष्करी पथके पुन्हा डोम्बासकडे वळविली आहे. यामुळे डोम्बासच्या क्षेत्रातील संघर्ष अधिकच तीव्र करण्याची तयारी रशियाने केल्याचे उघड होत आहे.
तर युक्रेनने रशियाच्या ताब्यात असलेल्या आपल्या झापोरेझिया व खेर्सन या प्रांतावर मोठे हल्ले चढविले आहेत. या हल्ल्यात रशियाची फार मोठी हानी झाल्याचा दावा युक्रेनी लष्कराने केला आहे. रशियाकडून याला दुजोरा मिळालेला नसून रशियाने हे दावे फेटाळून लावले आहेत. त्याचवेळी क्रिमिआ प्रांतातील युक्रेनच्या हल्ल्यामुळे रशियन हवाई दलाचे मोठे नुकसान झाले असून पुढच्या काळात ब्लॅक सीच्या क्षेत्रात रशियन विमाने काम करू शकणार नाही, अशी पाश्चिमात्य देशांच्या गुप्तचर यंत्रणा सांगत आहेत.
अजूनही रशियाने युक्रेनच्या विरोधात खरे युद्ध सुरूच केलेले नाही, असे काही आठवड्यांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी बजावले होते. युक्रेनच्या विरोधात आपली सारी शक्ती रशियाने पणाला लावलेली नाही, असे सांगण्याचा प्रयत्न रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी केला होता. पण पुढच्या काळात रशिया युक्रेनविरोधातील लष्करी मोहीम अधिकच तीव्र करणार असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले असून याचा फार मोठा फटका युक्रेनला बसू शकेल.