अंकारा – युक्रेन-रशियाच्या संघर्षापासून स्वत:ला अलिप्त ठेवणारा तुर्की उघडपणे रशियाविरोधात खडा ठाकला आहे. रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्याचा आरोप करून तुर्कीने मोंट्रेक्स कन्व्हेन्शन लागू करण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच कुठल्याही देशाच्या विनाशिकांनी ब्लॅक सीच्या क्षेत्राचा वापर करू नये, असे तुर्कीने बजावले आहे. थेट उल्लेख केला नसला तरी तुर्कीने सदर कराराचा वापर करून रशियाविरोधात आघाडी उघडल्याचा दावा अमेरिकी माध्यमे करीत आहेत.
तुर्कीचे परराष्ट्रमंत्री मेवलूत कावुसोग्लू यांनी काही तासांपूर्वी अमेरिकन वृत्तवाहिनीशी बोलताना युक्रेनवरील रशियाची कारवाई म्हणजे युद्ध असल्याचा आरोप केला होता. रशियाच्या हल्ल्यांमुळे क्षेत्रीय सुरक्षा धोक्यात आल्याचा दावा करून कावुसोग्लू यांनी संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेले अधिकार वापरण्याची घोषणा केली होती. बॉस्फोरसचे आखात बंद करून ब्लॅक सीच्या क्षेत्रात रशियन विनाशिकांची कोंडी करण्याचे तुर्कीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी जाहीर केले होते. १९३६ सालच्या मोंट्रेक्स कन्व्हेन्शननुसार संयुक्त राष्ट्रसंघानेच आपल्याला हे अधिकार दिल्याची आठवण कावुसोग्लू यांनी करुन दिली होती.
‘आत्तापर्यंत ब्लॅक सीचा वापर करण्याबाबत तुर्कीकडे कुठल्याही प्रकारची विचारणा झालेली नाही. पण यापुढे कुठल्याही देशाच्या नौदलाने या सागरी क्षेत्रातून प्रवास करू नये’, असा इशारा कावुसोग्लू यांनी तुर्कीच्या सरकारी वृत्तसंस्थेशी बोलताना दिला. तुर्कीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यामध्ये युक्रेन किंवा रशियाचा उघड उल्लेख केला नाही. असे असले तरी कावुसोग्लू यांनी ब्लॅक सीद्वारे बॉस्फोरसच्या आखाताचा वापर करणार्या रशियन नौदलासाठी हा इशारा असल्याचा दावा अमेरिकन माध्यमे करीत आहेत.
सध्या रशियाच्या सहा विनाशिका आणि पाणबुडी ब्लॅक सीच्या क्षेत्रात तैनात आहेत. मोंट्रेक्स कन्व्हेन्शननुसार, या विनाशिका तुर्कीच्या परवानगीनुसार सदर सागरी क्षेत्रातून बाहेर पडू शकत नसल्याचा दावा केला जातो. सध्या युक्रेन-रशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षावर याचा थेट परिणाम होईल, असा दावा पाश्चिमात्य माध्यमे करीत आहेत. काही तासांपूर्वी युरोपिय देशांनी रशियन विमानांना आपल्या हवाईहद्दीचा वापर बंद केला. अगदी त्याचप्रमाणे तुर्कीने रशियाच्या नौदलाला ब्लॅक सीचा वापर करण्यापासून रोखल्याचे तुर्की व युरोपमधील विश्लेषक लक्षात आणून देत आहेत.
दरम्यान, ब्लॅक सीचा मार्ग रोखला असला तरी यामुळे युक्रेन आणि रशियाबरोबरच्या तुर्कीच्या मैत्रीपूर्ण संबंधात फरक पडणार नसल्याचा दावा तुर्कीचे परराष्ट्रमंत्री करीत आहेत. पण रशियन विनाशिकांची कोंडी करणार्या तुर्कीने हा निर्णय घेऊन रशियाची नाराजी ओढावून घेतल्याची चर्चा आखाती माध्यमांमध्ये सुरू झाली आहे.