इराणबरोबरच्या अणुकराराला रशियाचे पूर्ण समर्थन असेल

- इराणच्या दौऱ्यावर असलेल्या रशियन परराष्ट्रमंत्र्यांची घोषणा

तेहरान – 2015 साली इराण आणि पाश्चिमात्य देशांमध्ये झालेल्या अणुकराराला रशियाचे पूर्ण समर्थन आहे. हा अणुकरार पुनर्जिवित करायला हवा, यासाठी अमेरिकेने इराणवरील निर्बंध मागे घ्यावे, अशी मागणी रशियन परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी केली.

रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी बुधवारी इराणला भेट देऊन राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांची भेट घेतली. यानंतर परराष्ट्रमंत्री लॅवरोव्ह यांनी इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन आमिरअब्दोल्लाहियान यांच्याशी क्षेत्रीय व आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा केली.

दोन्ही देशांमधील व्यापारी आणि इंधनविषयक सहकार्य वाढविण्याचे उभय देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांचे एकमत झाले आहे, असे इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने जाहीर केले. त्याचवेळी इराणने रशियन नागरिकांना व्हिसा मुक्त प्रवेश देण्याची तयारी केली आहे. दोन्ही देशांमधील सहकार्य वाढविण्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बाब ठरू शकते.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात आखातात दाखल होणार आहेत. त्याआधी रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी इराणला भेट देऊन अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची तयारी केल्याचा दावा इराणची सरकारी वृत्तवाहिनी करीत आहे. काही दिवसांपूर्वी रशियाच्या उपपंतप्रधानांनी इराणचा दौरा करून 20 वर्षांसाठीच्या सहकार्य करारावर चर्चा केली होती.

leave a reply