रशियाकडून युक्रेनच्या शहरावर हायपरसोनिक क्षेपणास्त्राचा मारा

हायपरसोनिक क्षेपणास्त्राचा माराकिव्ह – युक्रेनमधील युद्धाच्या २४ व्या दिवशी रशियाने आपण हायपरसोनिक क्षेपणास्त्राचा मारा केल्याचे जाहीर केले. तर या युद्धाची फार मोठी किंमत रशियाच्या पुढच्या पिढ्यांना चुकवावी लागेल, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी आणखी एकवार चर्चा केल्याची माहिती समोर आलेेली आहे. युक्रेनमध्ये रशियाचे हल्ले अधिकाधिक तीव्र होत चालले असून शनिवारी रशियाने हायपरसोनिक किंझल क्षेपणास्त्राचा मारा केला.

युक्रेनच्या पश्‍चिमेकडील इवानो-फ्रांक्विक्स् इथे क्षेपणास्त्रांचा भूमिगत साठा नष्ट करण्यासाठी किंझल क्षेपणास्त्राचा मारा करण्यात आल्याचे रशियाने स्पष्ट केले. तसेच युक्रेनच्या इतर शहरांवरही रशियाचे हवाई हल्ले सुरू आहेत. रशियन सैन्यानेही युक्रेनवरील कारवाई तीव्र केल्याचे दिसते आहे. रशियन सैन्याने युक्रेनचे मारिओपोल शहर ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी सुमारे ७० मिनिटे फोनवरून चर्चा केली. या चर्चेत राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी मारिओपोल शहराची रशियाने कोंडी करू नये व इथे मानवी सहाय्य पुरविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. युक्रेनचे लष्कर रशियाला जबरदस्त प्रतिकार करीत असल्याचे दावे पाश्‍चिमात्य माध्यमे करीत आहेत. मात्र रशियाचे सैन्य युक्रेनची शहरे बेचिराख करून, इथल्या अणुप्रकल्पांचा आणि काही शहरांचा ताबा घेत असल्याचे दिसत आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी युक्रेनमधील युद्धाचे विपर्यास्त चित्रण करणार्‍या पाश्‍चिमात्य माध्यमांवर सडकून टीका केली.

पाश्‍चिमात्य माध्यमे प्रचारकाचे काम करीत असून हा ‘इन्फॉर्मेशन टेररिझम’ अर्थात माहितीतंत्राच्या दहशतवादाचा भाग असल्याचे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह म्हणजे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मालकी असलेली वृत्तसंस्था ‘फॉक्स न्यूज’ युक्रेनमधील युद्धाबाबतची खरी माहिती देत आहे, असे लॅव्हरोव्ह पुढे म्हणाले. त्याचवेळी प्रचारयुद्धाच्या आघाडीवर रशिया या अतिशय मागे असलेला देश ठरतो, याची कबुलीही यावेळी लॅव्हरोव्ह यांनी दिली.

leave a reply