रशियाकडून ‘अँटी मिसाईल सिस्टिम’चा भाग असणार्‍या उपग्रहाचे प्रक्षेपण

उपग्रहाचे प्रक्षेपणमॉस्को – रशियाच्या संरक्षण विभागाने गुरुवारी क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेचा भाग असणार्‍या उपग्रहाचे प्रक्षेपण केले. सोयुझ-२ या रॉकेटच्या सहाय्याने हे प्रक्षेपण करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच रशियाने प्रगत क्षेपणास्त्राच्या सहाय्याने अंतराळातील आपला उपग्रह उडविला होता. या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय समुदायाने रशियावर जोरदार टीकास्त्र सोडले होते.

गुरुवारी उत्तर रशियातील ‘प्लेसेट्स्क कॉस्मोड्रोम’वरून लष्करी उपग्रह अंतराळात धाडण्यात आला. २०१९ साली रशियाने ‘कुपॉल अँटी मिसाईल डिफेन्स सिस्टिम’ विकसित करण्यास सुरुवात केली होती. नवा लष्करी उपग्रह त्याचा भाग असल्याचे रशियन सूत्रांनी सांगितले. ही यंत्रणा ‘अर्ली वॉर्निंग सिस्टिम’चा भाग असून त्यात बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा माग काढण्याची क्षमता असल्याचे रशियाकडून सांगण्यात आले.

‘स्पेसफ्लाईटनाऊ’ या वेबसाईटने रशियाने सोडलेला उपग्रह ‘टुंड्रा सॅटेलाईट’ असावा असा दावा केला आहे. यापूर्वी २०१५, २०१७ व २०१९ साली रशियाकडून या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले होते.

leave a reply