रशिया-युक्रेन युद्धातील अपप्रचार थांबविण्यासाठी रशियात नवा कायदा

- ट्विटर व फेसबुकवर निर्बंधांची घोषणा

मॉस्को – रशिया-युक्रेन युद्धादरम्यान पाश्‍चिमात्य माध्यमे व सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात अपप्रचार सुरू असल्याचे सांगून रशियन सरकारने त्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी नव्या कायद्यावर स्वाक्षरी केली असून त्याद्वारे सरकारविरोधात अपप्रचार करणार्‍यांना १५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. रशियाच्या या नव्या कायद्यानंतर अमेरिका व युरोपातील अनेक वृत्तवाहिन्या तसेच वृत्तसंस्थांनी रशियातील आपले काम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

गेले १० दिवस सुरू असलेल्या रशियायुक्रेन युद्धात विविध प्रकारचे व्हिडिओ तसेच फोटोग्राफ्स प्रसारमाध्यमांमधून तसेच सोशल मीडियावरून प्रसारित होत आहेत. रशियाच्या हल्ल्यात मृत झालेले युक्रेनचे नागरिक, रशियाविरोधी युद्धात सहभागी झालेले युक्रेनचे जवान, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी लष्करी गणवेश घालून दिलेली भेट यासारख्या घटनांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी प्रसिद्धी दिली जात आहेत. मात्र या घटनांचे दाखविण्यात आलेले व्हिडिओ तसेच फोटोग्राफ्स हा अपप्रचाराचा भाग असल्याचे उघड झाले आहे. युक्रेनमधील तरुणीने हातात गन घालून काढलेला फोटो तसेच रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचे फोटोदेखील अपप्रचाराचा भाग असल्याचे समोर आले.

या वाढत्या अपप्रचाराविरोधात रशियाने आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वीच रशियाच्या संसदेने ‘फेक न्यूज’ विरोधातील विधेयकाला मंजुरी दिली असून रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी त्याच्यावर स्वाक्षरी केली आहे. या कायद्यानुसार, रशियात युद्धासंदर्भात खोटी माहिती पसरविणार्‍यांना १५ वर्षांपर्यंत तुरुंगात धाडण्यात येणार आहे. अशांवर आर्थिक दंडही लादला जाऊ शकतो, अशी माहिती रशियन सूत्रांनी दिली आहे. ही कारवाई प्रामुख्याने रशियाविरोधी भूमिका घेणार्‍या पाश्‍चिमात्य वृत्तवाहिन्यांविरोधात असल्याचे सांगण्यात येते.

प्रसारमाध्यमांबरोबरच सोशल मीडियाविरोधातही रशियाने पावले उचलली आहेत. फोटोग्राफ्स व व्हिडिओज्च्या माध्यमातून फैलावणार्‍या अपप्रचाराला रोखण्यात अपयशी ठरल्याचे कारण पुढे करून रशियाने ट्विटर व फेसबुक या दोन सोशल मीडिया वेबसाईट्सवर बंदी घातली आहे.

leave a reply