रशियाला युरोपिय देशांचे हवाईक्षेत्र वापरता येणार नाही

- युरोपिय महासंघाची घोषणा

ब्रुसेल्स – युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर रशियन राजवटीवर निर्बंध लादणार्‍या पाश्‍चिमात्य देशांनी त्याची धार अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. रशिया यापुढे युरोपिय देशांचे हवाईक्षेत्र वापरु शकणार नाही, अशी घोषणा युरोपिय महासंघाने केली आहे. त्याचवेळी रशियाच्या सरकारी वृत्तवाहिन्या व चॅनल्सच्या प्रसारणावरही युरोपात बंदी जाहीर करण्यात आली आहे. युक्रेन हल्ल्यासाठी रशियाला सहाय्य करणार्‍या बेलारुसवरही नवे निर्बंध लादण्यात आले आहेत.

रशियाने युक्रेनवर हल्ला चढविल्यानंतर पाश्‍चिमात्य देशांनी एकापाठोपाठ एक निर्बंधांची घोषणा करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काळात रशियन बँका व राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या निकटवर्तियांना लक्ष्य करण्यात आले. मात्र त्यानंतर निर्बंधांची व्याप्ती वाढण्यास सुरुवात झाली असून रशियातील इतर क्षेत्रे व व्यवहारांनाही लक्ष करण्यात येत आहे. रविवारी युरोपिय कमिशनच्या प्रमुख उर्सुला व्हॉन डेर लेयेन यांनी केलेली घोषणा त्याचाच भाग ठरते.

‘रशियाच्या सर्व विमानांसाठी युरोपिय महासंघाच्या सदस्य देशांची हवाईहद्द बंद करण्यात येत आहे. यात रशियन उद्योजकांच्या खाजगी विमानांचाही समावेश आहे. रशियन राजवटीच्या प्रचारयंत्रणेचा भाग असलेल्या वाहिन्यांच्या प्रसारणावरही बंदी घालण्यात येत आहे. रशिया टुडे व स्पुटनिक या दोघांसह त्यांच्याशी संबंधित उपक्रमांचे प्रसारण थांबविण्यात येत आहे. यापुढे सदर वाहिन्या रशियन राष्ट्राध्यक्षांकडून सुरू असलेला खोट्या माहितीचा प्रचार करु शकणार नाहीत’, अशा शब्दात व्हॉन डेर लेयेन यांनी रशियावरील नवे निर्बंध जाहीर केले. रशियाला सहाय्या करणार्‍या बेलारुसच्या राजवटीवरही नवे कठोर निर्बंध लादण्यात येत आहेत, अशी घोषणा युरोपिय महासंघाच्या प्रमुखांनी केली.

रशियावर निर्बंध लादतानाच महासंघाने युक्रेनच्या सहाय्यासाठीही मोठे निर्णय घेतले आहेत. युरोपिय महासंघाने ‘युरोपियन पीस फॅसिलिटी’ हा स्वतंत्र उपक्रम स्थापन केला आहे. या माध्यमातून युक्रेनसाठी शस्त्रसहाय्य तसेच लष्करी प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी सुमारे साडेपाच अब्ज युरो इतका निधी राखून ठेवण्यात येणार आहे. त्याचवेळी युक्रेनमधून युरोपात येणार्‍या निर्वासितांना पुढील तीन वर्षे विशेष प्रक्रियेअंतर्गत आश्रय देण्यात येणार आहे. महासंघाचे सदस्य असलेल्या सर्व देशांना युक्रेनिअन निर्वासितांना आश्रय देणे बंधनकारक राहणार आहे.

युरोपने टाकलेल्या या निर्बंधांना रशियाने प्रत्युत्तर दिले असून युरोपिय कंपन्या व विमानांवरही हवाईक्षेत्र वापरण्यास मज्जाव केला आहे. त्याचवेळी युरोपिय देशांमधील रशियन नागरिकांना माघारी आणण्याचीही तयारी सुरू करण्यात आली आहे. रशियन यंत्रणेकडून यासंदर्भातील निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. युरोपातील रशियन नागरिकांना त्या देशातील दूतावासाशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगण्यात येते.

leave a reply