मॉस्को- लिमनमधील माघारीनंतर रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे समर्थक अधिक आक्रमक झाल्याचे समोर येत आहे. चेचेन नेते रमजान कादिरोव्ह यांनी, रशियाने युक्रेनवर ‘टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स’च्या सहाय्याने हल्ले करावेत, अशी खळबळजनक मागणी केली आहे. कादिरोव्ह यांच्यापूर्वी बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को तसेच रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मेदवेदेव्ह यांनीदेखील अण्वस्त्रांच्या हल्ल्याबाबत वक्तव्ये केली होती. मात्र कादिरोव्ह यांनी थेट कमी क्षमतेच्या अण्वस्त्रांच्या वापराची मागणी केल्याने अणुहल्ल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
काही दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अण्वस्त्रांचा वापर करण्याबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर रशियाच्या वरिष्ठ नेत्यांनी, रशियाच्या ताब्यात आलेल्या युक्रेनी प्रांतांसाठी आण्विक तैनाती शक्य असल्याचे दावे केले होते. यावर पाश्चिमात्य देशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अमेरिकेने पुतिन यांना गंभीर परिणामांचा इशारा दिल्याचेही समोर आले होते.
यापूर्वी खार्किव्हमधून रशियाला माघार घेणे भाग पडल्यावरही कादिरोव्ह यांनी आक्रमक वक्तव्ये केली होती. आपण स्वतः पुतिन यांची भेट घेऊन परिस्थितीची जाणीव करून देऊ, असे कादिरोव्ह यांनी म्हटले होते.