मॉस्को/नवी दिल्ली – रशिया पुरस्कृत ‘कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रिटी ऑर्गनायझेशन’(सीएसटीओ) ही संघटना भारताला निरीक्षक किंवा भागीदार देश म्हणून स्वीकारण्यास तयार आहे, असा दावा रशियन अधिकार्यांनी केला आहे. ‘सीएसटीओ’मधील रशियाचे कायमस्वरुपी प्रतिनिधी मिकाएल ऍगासँडिअन यांच्यासह रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी यासंदर्भात वक्तव्ये केली आहेत. ‘सीएसटीओ’मध्ये एकेकाळी सोव्हिएत संघराज्याचा भाग असलेल्या मध्य आशियाई देशांचा सहभाग असून या देशांमधील चीनचा प्रभाव रशियासाठी चिंतेची बाब ठरली आहे. त्यामुळे भारत व मध्य आशियाई देशांमधील सहकार्यासाठी रशिया पुढाकार घेत असल्याचे वरिष्ठ अधिकार्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते.
अमेरिका व सोव्हिएत रशिया यांच्यामधील शीतयुद्ध शीगेला पोहोचलेले असताना, भारताने तटस्थ राहण्याचे धोरण स्वीकारून अलिप्त राष्ट्रांची संघटना उभी केली होती. पण सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर शीतयुद्ध संपले. मात्र अमेरिका आणि रशिया पुन्हा एकदा संघर्षाच्या पवित्र्यात एकमेकांसमोर खडे ठाकले आहेत. युक्रेनच्या प्रश्नावर निर्माण झालेला तणाव हेच दाखवून देत आहे. अशा परिस्थितीत भारताने रशियाला साथ देऊ नये, अशी अपेक्षा अमेरिका व्यक्त करीत आहे. युक्रेनच्या प्रश्नावर रशियाच्या बाजूने उभे राहिल्यास, चीनला त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील, असे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी नुकतेच बजावले होते. भारताला अद्याप अमेरिकेने असा निर्वाणीचा इशारा दिलेला नाही. पण अमेरिका-नाटोच्या विरोधात जाऊन भारताने रशियाला साथ दिली तर ते अमेरिका खपवून घेणार नाही, असे संदेश अमेरिकेकडून दिले जात आहेत.
या पार्श्वभूमीवर, रशियाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी भारताबाबत केलेली वक्तव्ये लक्ष वेधून घेणारी ठरतात. भारतातील रशियाचे नवे राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत, भारत व सीएसटीओमधील संबंध अधिक मजबूत व्हावेत, अशी रशियाची इच्छा असल्याचे म्हटले होते. ‘दक्षिण आशियातील सर्वात मोठा देश असणारा भारत हा रशियासाठी प्राधान्यक्रम असलेला देश आहे. मध्य आशियाई देश व सीएसटीओमधील देशांबरोबर भारताचे वाढते सहकार्य गेमचेंजर ठरु शकते. सीएसटीओबरोबरील संबंध अधिक दृढ झाल्यास रशियासाठी ती समाधानाची बाब ठरेल. भारत व सीएसटीओमध्ये संपर्क यापूर्वीच प्रस्थापित झालेला आहे’, याकडे अलिपोव्ह यांनी लक्ष वेधले होते.
त्यापाठोपाठ ‘सीएसटीओ’मधील रशियाचे कायमस्वरुपी प्रतिनिधी मिकाएल ऍगासँडिअन यांनी, भारताने या संघटनेत निरीक्षक किंवा भागीदार म्हणून सामील होण्यासाठी प्रयत्न केल्यास त्याचा विचार केला जाईल, असे म्हटले आहे. भारत ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची सत्ता असून युरेशियन क्षेत्रात भारताचे हितसंबंध असल्याचा उल्लेखही त्यांनी केला होता.
गेल्याच महिन्यात भारत व मध्य आशियाई देशांची व्हर्च्युअल बैठक पार पडली होती. त्यापाठोपाठ ‘कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रिटी ऑर्गनायझेशन’मधील (सीएसटीओ) सहभागासंदर्भात रशियाकडून करण्यात आलेली वक्तव्ये महत्त्वाची ठरतात. भारताचे चीनबरोबरील व रशियाचे अमेरिकेबरोबरील संबंध ताणलेले असताना, या सहकार्याला फार मोठे सामरिक महत्त्व आले आहे. अफगाणिस्तानचा ताबा तालिबानकडे आल्यानंतर भारत व रशियाच्याही सुरक्षेला फार मोठा धोका संभवतो. त्याचा दाखला देऊन भारत व रशिया तसेच मध्य आशियाई देशांचे अफगाणिस्तानबाबतचे हितसंबंध एकसमान असल्याचा दावा रशियाने केला होता.