रशिया, सिरियाची तुर्कीसंलग्न दहशतवाद्यांवर जोरदार कारवाई

- हल्ले रोखण्यासाठी तुर्कीचे रशियाला आवाहन

दमास्कस – रशिया आणि सिरियन लष्कराने अलेप्पो, हमा आणि राक्का या तीन प्रांतामध्ये दहशतवाद्यांविरोधात जोरदार कारवाई हाती घेतली आहे. रशिया व सिरियाने किमान १०० हून अधिक हल्ले चढविल्याचा दावा केला जातो. ‘आयएस’, ‘अल-नुस्र’ तसेच तुर्कीसंलग्न दहशतवादी संघटनांकडून संघर्षबंदीचे उल्लंघन सुरू आहे. त्यामुळे रशिया व सिरियाने ही कारवाई हाती घेतल्याचे बोलले जाते. दरम्यान, गुरुवारी केलेल्या कारवाईतील काही रॉकेट्स तुर्कीच्या दक्षिण सीमाभागात कोसळली आहेत. यानंतर तुर्कीने रशियाला हल्ले रोखण्याचे आवाहन करून आपल्या लष्कराला अलर्टवर ठेवले आहे.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसात दहशतवाद्यांकडून सिरियाच्या उत्तर व वायव्य भागात ३६ वेळा संघर्षबंदीचे उल्लंघन झाले. यामध्ये इदलिबमध्ये १५ तर लताकिया १२, हमा ६ आणि अलेप्पोमध्ये तीन वेळा संघर्षबंदी मोडून नागरी तसेच लष्करी ठिकाणांजवळ हल्ले झाले. या व्यतिरिक्त इतर काही भागातही संघर्षबंदीचे उल्लंघन तसेच इंधनाची तस्करी सुरू असल्याचा आरोप रशियन संरक्षण मंत्रालयाने केला आहे. मागे ‘आयएस’, ‘अल-नुस्र’ आणि सिरियातील तुर्कीसंलग्न दहशतवादी गट असल्याचा आरोप रशिया व सिरिया करीत आहेत.

रशिया व सिरियाने संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत दहशतवाद्यांची किती जीवितहानी झाली याचे तपशील उघड झालेले नाहीत. मात्र तुर्कीसंलग्न दहशतवाद्यांनी केलेल्या एका हल्ल्यात तीन मुलांचा बळी गेल्याचा दावा स्थानिक माध्यमे करीत आहेत. दहशतवादी संघटनांच्या या हल्ल्यानंतर रशिया व सिरियाने गेल्या चोवीस तासात मोठी मोहीम हाती घेतली आहे. रशिया व सिरियाने दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर किमान शंभरहून अधिक हवाई हल्ले चढविल्याचा दावा केला जातो. अलेप्पो-हमा-राक्का यांना जोडणार्‍या भागात दबा धरुन बसलेल्या ‘आयएस’च्या दहशतवाद्यांवर रशिया व सिरियन लष्कराने कारवाई केली.

देर अल-झोरच्या ‘माऊंट अल-बाशरी’ भागात रशियाने तब्बल ८० हल्ले चढविल्याचा दावा स्थानिक सूत्रांनी केला आहे. तर सध्या तुर्कीच्या नियंत्रणात असलेल्या वायव्य सिरियाच्या अलेप्पोमधील इंधनप्रकल्पांना रशियाने लक्ष्य केले. या इंधनप्रकल्पांचा तुर्कीसंलग्न दहशतवाद्यांनी ताबा घेतला आहे.

सिरियातील कुर्दांकडून आपल्याला धोका असल्याचे दावे ठोकून तुर्की सिरियाच्या भूभाग घुसखोरी करीत आहे. मात्र तुर्कीला सिरियाच्या इंधनक्षेत्राचा ताबा घ्यायचा आहे आणि त्यासाठीच तुर्की हे सारे घडवित असल्याचा आरोप केला जातो. त्या पार्श्‍वभूमीवर, रशियाचे हे हल्ले तुर्कीला फार मोठा धक्का देणारे ठरतात.

गेल्या दहा दिवसात रशियाने सिरियातील तुर्कीसंलग्न दहशतवाद्यांवर चढविलेला हा दुसरा हवाई हल्ला ठरतो. रशियाच्या या हल्ल्यांवर तुर्कीकडून त्वरित प्रतिक्रिया आली असून रशियाने सदर भागातील हल्ले थांबवावे, असे आवाहन तुर्कीने केले आहे. तसेच तुर्कीने आपल्या लष्कराला अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत.

गुरुवारी सिरियन लष्कराने तुर्कीच्या ताब्यातील उत्तरेकडील भागात रॉकेट हल्ले चढविले. यातील काही रॉकेट्स सिरियाची सीमा ओलांडून तुर्कीच्या भागात कोसळले. यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. यावर तुर्कीने पुन्हा एकदा रशियाकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सिरियाने हे हल्ले चढवू नये, अशी मागणी तुर्कीने केल्याच्या बातम्या येत आहेत.

सिरियाच्या सीमाभागात तसेच त्याच्याही पुढे जाऊन सिरियाचे इंधनक्षेत्र बळकावणार्‍या तुर्कीला रशिया व सिरियाच्या हल्ल्याद्वारे सज्जड इशारा मिळाला आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे प्रशासन सत्तेवर असून पुढच्या काळात तुर्कीला अमेरिकेकडून सहाय्य मिळण्याची शक्यता धुसर बनत चालली आहे. त्याचवेळी सौदी, युएई या आखाती देशांबरोबरच ग्रीस, सायप्रस या देशांबरोबरील तुर्कीचे संबंध विकोपाला गेले आहेत. अशा परिस्थितीत सिरियात तुर्कीला बसलेला हा धक्का हे या देशासमोरील नवे आव्हान उभे राहिल्याचे दाखवून देत आहे.

leave a reply