क्षेत्रिय सुरक्षेसाठी रशिया अरब देशांबरोबरील सहकार्य भक्कम करणार

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

मॉस्को/अल्जिअर्स – इंधन उत्पादनातील कपातीच्या मुद्यावर अमेरिका आणि अरब देशांमध्ये तणाव निर्माण झालेला असताना रशिया व अरब देशांमधील सहकार्य वाढत आहे. क्षेत्रिय सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित करून रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अरब देशांबरोबरचे सहकार्य अधिकच भक्कम करणार असल्याची घोषणा केली. यासाठी आखाती आणि उत्तर आफ्रिकी देशांचा सहभाग असलेली बहुराष्ट्रीय यंत्रणा उभारण्याचे संकेत रशियन राष्ट्राध्यक्षांनी दिले.

putin arab leagueउत्तर आफ्रिकेतील अल्जेरियाची राजधानी अल्जिअर्समध्ये मंगळवारपासून ‘अरब लीग’ची ३१वी बैठक सुरू झाली आहे. व्हर्च्युअल माध्यमातून या बैठकीला संबोधित करताना रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अरब देशांबरोबरचे सहकार्य अधोरेखित केले. २२ देशांचा समावेश असलेल्या अरब लीगबरोबरचे सहकार्य भक्कम करण्यासाठी रशिया प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले. क्षेत्रीय आणि जागतिक सुरक्षेसाठी हे सहकार्य आवश्यक असल्याचा दावा रशियन राष्ट्राध्यक्षांनी केला.

रशिया व अरब देशांमधील सहकार्यामुळे आखात आणि उत्तर आफ्रिकी देशांसमोरील लष्करी आणि राजकीय मुद्दे सोडविता येतील, असा विश्वास राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी व्यक्त केला. सिरिया व लिबियातील संकटापासून ते येमेनमधील संघर्षाचा मुद्दा तसेच इस्रायल-पॅलेस्टाईनमधील संघर्ष आंतरराष्ट्रीय नियमांच्या आधारे आणि सार्वभौमत्त्व व क्षेत्रीय सुरक्षा अबाधित राखून सोडविता येऊ शकतात, असे रशियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले.

दरम्यान, ओपेक प्लसच्या बैठकीत इंधनाच्या उत्पादनात कपात करण्याच्या निर्णयावरुन अमेरिका आणि सौदी अरेबिया व युएईबरोबरचे संबंध तणावपूर्ण बनले आहेत. या निर्णयासाठी अमेरिकेने सौदीला जबाबदार धरल्यानंतर इराक, कतार, बाहरिन तसेच इतर देशांनी सौदीला समर्थन दिले होते. त्यामुळे अमेरिका व आखाती देशांचे संबंध बिघडल्याची चर्चा सुरू झाली होती. अशा काळात रशिया आणि आखाती देशांचे संबंध अधिक दृढ होऊ लागल्याचे आंतरराष्ट्रीय विश्लेषक लक्षात आणून देत आहेत. युएईचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झाएद यांनी रशियाचा विशेष दौरा करून राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेतली होती.

leave a reply