युक्रेनच्या मुद्यावर रशिया जगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे

- अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांचा आरोप

जगाची दिशाभूलवॉशिंग्टन/मॉस्को – ‘युक्रेनमध्ये रशियाकडूनच चिथावणीखोर घटना घडली तर त्यात कोणालाही आश्‍चर्य वाटणार नाही. अशा घटनेचा वापर करून रशिया लष्करी हल्ल्याचे समर्थन करेल. रशियाची ही लबाडी लक्षात येईपर्यंत कदाचित खूप उशिर झालेला असेल`, अशा शब्दात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी रशिया जगाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. अमेरिकेपाठोपाठ नाटोच्या प्रमुखांनीही रशियाबाबत इशारा दिला असून त्यांनी युक्रेनमध्ये संघर्षाचा भडका उडण्याचा धोका प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता वाढल्याचे बजावले आहे.

पुढील आठवड्यात युक्रेन समस्येच्या मुद्यावर रशिया, अमेरिका व नाटोमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत रशियाने प्रस्तावित केलेल्या ‘सिक्युरिटी पॅक्ट`वर चर्चा होण्याची शक्यता आहे. आपण दिलेल्या प्रस्तावाकडे अमेरिका व नाटोने दुर्लक्ष केले तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा रशियाने आधीच दिला होता. त्याचवेळी युक्रेन सीमेवर रशिया नाही तर युक्रेनची राजवटच आपल्याला चिथावणी देत असल्याचा आरोप रशियाने केला आहे. यावर पाश्‍चात्यांकडून आक्रमक सूर उमटले आहेत.

रशिया युक्रेनवर केवळ लष्करी आक्रमणाची तयारी करतो आहे, असे नाही. रशियाकडून युक्रेनमधील लोकशाही यंत्रणा खिळखिळी करण्यात येत आहे. युक्रेनचा व्यापार व इंधनपुरवठा रोखण्यात येत आहे, राजकीय नेते व जनतेवर दडपण टाकण्याचे प्रयत्न सुरू आहे. युक्रेनमधील महत्त्वाच्या यंत्रणांवर सायबरहल्ले चढविण्यात आले आहेत. त्यानंतर गेल्या काही महिन्यात युक्रेनच्या सीमेवर रशियाकडून मोठ्या प्रमाणावर लष्करी तैनाती करण्यात आली आहे. ही पार्श्‍वभूमी समोर असतानाही युक्रेनच चिथावणीखोर हालचाली करीत असल्याचे सांगून रशिया जगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे`, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी दिला.

यापूर्वी 2014 सालीही रशियाने याच प्रकारे दिशाभूल करून युक्रेनवर आक्रमण केले होते व त्याचे समर्थनही केले होते, याकडे अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष वेधले. अमेरिकेबरोबरच नाटोनेही रशियावर टीकास्त्र सोडले आहे. ‘युक्रेनच्या मुद्यावर संघर्षाचा भडका उडण्याचा धोका अधिकच वाढला आहे. रशियाच्या आक्रमक कारवायांनी युरोपची सुरक्षा कमकुवत होत असल्याचे दिसत आहे`, असे नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी बजावले. युरोपातील शस्त्रांच्या तैनातीबाबत नाटो रशियाशी चर्चा करण्यास तयार आहे, मात्र यासंदर्भातील नियंत्रण एकतर्फी असणार नाही, याची जाणीवही नाटोच्या प्रमुखांनी करून दिली. ब्रिटन व फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही रशियाच्या हालचालींवर आक्षेप नोंदविला असून, युक्रेन सीमेवरील परिस्थिती बिघडविणाऱ्या कारवाया थांबवाव्यात, असा इशारा दिला आहे.

रशियाने युक्रेनच्या सीमेवर सुमारे एक लाख जवान तैनात केल्याचा दावा अमेरिका व युक्रेनकडून करण्यात आला आहे. ही तैनाती युक्रेनवरील नव्या आक्रमणाची तयारी असल्याचे इशारे पाश्‍चात्य नेते तसेच विश्‍लेषकांकडून देण्यात येत आहेत. मात्र रशियाने ही तैनाती आक्रमणासाठी नसून संरक्षणासाठी असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

leave a reply