मॉस्को – युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्या काही दिवसात रशियाला आव्हाने देणारे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष रशियाबरोबर चर्चेला तयार झाल्याचे वृत्त आहे. इस्रायल तसेच तुर्कीने रशिया व युक्रेनमध्ये संघर्षबंदी घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याला काही अंशी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन व रशियन राष्ट्राध्यक्षांची फोनवरून एक तास चर्चा पार पडली. तसेच रशियाचा दौरा करून इस्रायली पंतप्रधानांनीही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेतली होती. तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन यांनीही रविवारी रशियन राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून चर्चा केली.
रशियन राष्ट्राध्यक्षांबरोबर, इस्रायली पंतप्रधान, तुर्की व फ्रान्सच्या राष्ष्ट्राध्यक्षांनी केलेली चर्चा म्हणजे संघर्षबंदीच्या दिशेने टाकलेली पावले असू शकतात, असे दावे माध्यमे रीत आहेत. युक्रेनच्या समस्येतून शांतीपूर्ण मार्ग काढण्यासाठी तुर्की प्रयत्न करील, असे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याबरोबरील चर्चेत स्पष्ट केले. युक्रेनने युद्ध थांबवले आणि रशियाच्या मागण्या मान्य केल्या, तरच रशिया युक्रेनमधील आपली लष्करी मोहीम थांबविल, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी या चर्चेत ठासून सांगितले. याबरोबरच युक्रेनमधील रशियाची लष्करी मोहीम योजनेनुसार पुढे जात असल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी या चर्चेत दिली.
याआधी रशिया व युक्रेनमध्ये चर्चेचे दोन टप्पे पार पडले होते. मात्र बेलारूसमध्ये झालेल्या या चर्चेतून फारसे काही निष्पन्न झालेले नाही. सोमवारपासून या चर्चेचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. ही चर्चा सुरूहोत असतानाच, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी आपण तुर्कीच्या शहरामध्ये रशियन राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करण्यास तयार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सोमवारपासून सुरू होत असलेल्या चर्चेचे महत्त्व कमी झाल्याचे दिसते आहे. मात्र युक्रेनी राष्ट्राध्यक्षांनी दिलेला प्रस्ताव रशियाने अजूनही स्वीकारलेला नाही. पण रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह या आठवड्यात तुर्कीला भेट देणार असल्याचे सांगितले जाते. युक्रेनचे परराष्ट्रमंत्रीही या काळात तुर्कीमध्ये येऊन रशियन परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा करतील, असे दावे तुर्कीच्या माध्यमांनी केले आहेत.