मॉस्को/किव्ह – रशियाकडून डोन्बाससह इतर भागांमध्ये सुरू असलेल्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर युक्रेन जेरीस आला असून युरोपिय महासंघ तसेच नाटोबाबत अवास्तव दावे करण्यास सुरुवात केली आहे. ‘थ्री सीज् इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून युक्रेनने महासंघात मागच्या दाराने प्रवेश मिळविल्याचा दावा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार अलेक्सी अरेस्टोविच यांनी केला. युक्रेन हा नाटोचा ‘डिफॅक्टो मेंबर’ अर्थात अघोषित सदस्य बनला असल्याचेही युक्रेनचे सल्लागार अरेस्टोविच यांनी म्हटले आहे.
रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस अधिक आक्रमक व भीषण होत चालल्याचे संकेत मिळत आहेत. रशियन फौजांनी हल्ल्यांची तीव्रता वाढविली असून गेल्या दोन दिवसात लुहान्स्कमधील तीन मोक्याच्या भागांवर ताबा मिळविला आहे. तर डोनेत्स्क प्रांतातील 55 टक्के भागावर रशियन फौजांनी नियंत्रण मिळविल्याची कबुली युक्रेनी अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या 24 तासात रशियाने सेव्हेरोडोनेत्स्क व लिशिचान्स्कसह खार्किव्ह, बाखमत, सुमी, मायकोलेव्ह या परिसरात मोठ्या प्रमाणावर रॉकेट्स, बॉम्ब तसेच क्षेपणास्त्रांचा मारा केला. रशियाच्या हल्ल्यामुळे परिस्थिती बिकट झाली असून युक्रेनी फौजांना ‘स्लोव्हिआन्स्क’ शहरात माघार घ्यावी लागेल, असे संकेत स्थानिक अधिकारी तसेच विश्लेषकांनी दिले आहेत.
रशियाकडून मोठे नुकसान होत असतानाच युक्रेनने पाश्चिमात्यांबरोबरील संबंध अधिक दृढ करून मोठे सहाय्य मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. युक्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून युरोपिय महासंघ व नाटोतील सदस्यत्वाबाबत मोठे दावे करण्यात येत आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचे सल्लागार अलेक्सी अरेस्टोविच यांनी एका मुलाखतीदरम्यान अवास्तव वक्तव्ये केली आहेत. त्यात युक्रेनने
‘थ्री सीज इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून महासंघात मागच्या दाराने प्रवेश मिळविल्याचे म्हटले आहे. ‘थ्री सीज इनिशिएटिव्ह’मध्ये महासंघाच्या 12 सदस्य देशांचा समावेश असून त्यांच्याकडून युक्रेनला मोठ्या प्रमाणावर निधी व इतर सहाय्य उपलब्घ होईल, असे अरेस्टोविच यांनी सांगितले. त्यांनी नाटो व युक्रेनबाबतही वक्तव्य केल्याचे समोर आले असून त्यात युक्रेन हा नाटोचा ‘डिफॅक्टो मेंबर’ बनल्याचा दावा केला. अधिकृतरित्या युक्रेनचे नाव नाटोत नसले तरी नाटो सदस्य देशांकडून सर्व प्रकारचे संरक्षणसहाय्य मिळत असून अमेरिकेने ते कायम ठेवण्याचे आश्वासन दिल्याचेही अरेस्टोविच यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गुरुवारी झालेल्या बैठकीत युरोपियन संसदेने युक्रेनला महासंघाचा सदस्य बनविण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यानंतर महासंघाच्या 27 सदस्य देशांची बैठक सुरू झाली आहे. महासंघाच्या प्रमुखांकडून मोठे दावे करण्यात आले असले तरी काही सदस्य देश युक्रेनला उमेदवार देश म्हणून दर्जा देण्यास फारसे उत्सुक नाहीत.