रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही

- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन

सत्तेवर राहण्याचा अधिकारवॉशिंग्टन/मॉस्को – रशियाला युक्रेनमध्ये कधीच विजय मिळणार नाही, असे सांगून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी बजावले आहे. बायडेन यांच्या या वक्तव्यावर रशियाने टीकास्त्र सोडले असून रशियाचे नेतृत्त्व ठरविण्याचा अधिकार बायडेन यांना दिलेला नसल्याचे रशियन प्रवक्त्यांनी बजावले. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी बायडेन यांच्या वक्तव्यावर खुलासा देताना, रशियात राजवट बदलण्याचा अमेरिकेचा इरादा नसल्याचे सांगितले. व्हाईट हाऊसनेही निवेदन देऊन, बायडेन यांचे वक्तव्य रशियात सत्ताबदल घडविण्यासंदर्भातील नव्हते असे म्हटले आहे.

शनिवारी पोलंडमधील एका कार्यक्रमादरम्यान बायडेन यांनी रशियन राष्ट्राध्यक्षांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. ‘युक्रेनवर हल्ला चढविणारे पुतिन कसाई आहेत. रशिया युक्रेनमध्ये कधीच विजयी होऊ शकणार नाही. पुतिन यापुढे सत्तेवर राहू शकणार नाहीत’, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन म्हणाले होते. यावेळी त्यांनी रशियाला नाटो सदस्य देशाचा एक इंचही मिळू देणार नाही, असा इशाराही दिला. यावेळी बायडेन यांनी युक्रेनमधील युद्ध हे रशियाचे धोरणात्मक अपयश असल्याचाही दावा केला.

सत्तेवर राहण्याचा अधिकारबायडेन यांच्या वक्तव्यावर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. ‘रशियाचे नेतृत्व कोणी करायचे हे ठरविण्याचा अधिकार बायडेन यांना नाही. रशियाचा राष्ट्राध्यक्ष रशियन जनता निवडते’, असा टोला पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी लगावला. बायडेन यांच्या वक्तव्यावर अमेरिकेतूनही खुलासा करण्यात आला आहे.

‘बायडेन यांना रशियातील सत्ताबदलाबाबत वक्तव्य करायचे नव्हते. पुतिन आपल्या शेजारी देशांवर सत्ता गाजवू शकत नाहीत, असे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना म्हणायचे आहे’, अशी सारवासारव व्हाईट हाऊसने केली. तर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनीही, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची राजवट उलथण्याचा अमेरिकेचा इरादा नसल्याचा खुलासा दिला आहे. पुतिन यांना युक्रेन किंवा इतर कोणत्याही देशाविरोधात युद्ध पुकारण्याचा अधिकार नाही, असे बायडेन यांना म्हणायचे असल्याचे ब्लिंकन यांनी पुढे सांगितले.

leave a reply