जेरूसलेम – गेल्या आठवड्यात इस्रायलच्या लढाऊ विमानांनी सिरियात हवाई हल्ले चढविले होते. इस्रायलच्या या विमानांना रोखण्यासाठी सिरियाने हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली होती. इस्रायली वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, सिरियामध्ये तैनात असलेल्या रशियाच्या ‘एस-300′ हवाई सुरक्षा यंत्रणेने इस्रायली विमानांवर हल्ला चढविला. यामुळे रशियाच्या इस्रायलबाबतच्या भूमिकेत मोठा बदल झाल्याची नोंद इस्रायली वृत्तवाहिनीने केली आहे. रशियाविरोधी युद्धात युक्रेनला सहाय्य करण्यासाठी इस्रायलने पुढाकार घेतल्यानंतर रशियाच्या धोरणात हा बदल झाल्याचे दिसत आहे.
गेल्या शुक्रवारी इस्रायलच्या लढाऊ विमानांनी सिरियाच्या वायव्येकडील मसयाफ शहराजवळ जोरदार हल्ले चढविले होते. याबाबत सिरियन तसेच आखाती माध्यमांनी वेगवेगळी माहिती प्रसिद्ध केली होती. पण या हल्ल्यात इराणसंलग्न गटाचे जबर नुकसान झाल्याचा दावा इस्रायली माध्यमांनी केला होता. तसेच इस्रायली विमानांना पिटाळण्यासाठी सिरियन लष्कराने ‘पँटसिर’ हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केल्याची माहिती समोर आली होती.
पण इस्रायली वृत्तवाहिनी ‘चॅनेल 13’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, सिरियामध्ये तैनात रशियन एस-300 या विमानभेदी क्षेपणास्त्र यंत्रणेने इस्रायली विमानांवर हल्ला चढविला. तर ‘चॅनेल 12′ वृत्तवाहिनीने याबाबत नवा दावा केला. रशियन एस-300 यंत्रणेच्या माऱ्यात इस्रायली लढाऊ विमाने येऊ शकली नाहीत. त्यामुळे सदर यंत्रणा इस्रायली विमानांचे काहीही हानी करू शकली नाही, असा दावा इस्रायली वृत्तवाहिनीने केला.
रशियन लष्कराशिवाय ही यंत्रणा कुणीही हाताळू शकत नाही. तसेच रशियाच्या नेतृत्वाकडून परवानगी मिळाल्याखेरीज इस्रायली विमानांवर कारवाई होऊ शकत नाही, याकडे इस्रायली वृत्तवाहिनी लक्ष वेधत आहे. त्यामुळे सिरियातील ही कारवाई रशिया आणि इस्रायलमधील संबंधात मोठा बदल झाल्याचे संकेत देणारी असल्याचे इस्रायली वृत्तवाहिन्यांचे म्हणणे आहे. इस्रायल किंवा रशियाने याला दुजोरा दिलेला नाही. पण असे असल्यास, हा रशियाचा इस्रायलवरील हा पहिला हल्ला ठरेल आणि यामुळे ही इस्रायलसाठी सर्वात चिंताजनक घडामोड ठरू शकते, असे इस्रायली वर्तमानपत्रे सांगत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि रशियामध्ये तणाव निर्माणझाला आहे. रशिया-युक्रेन युद्धात तटस्थ भूमिका स्वीकारणाऱ्या इस्रायलने रशियावर टीका सुरू केली आहे. तसेच इस्रायलने रशियाचा विरोध डावलून युक्रेनला लष्करी सहाय्य सुरू केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर युक्रेनचे सरकार नाझीवादाचा पुरस्कार करणारे असून त्यांच्याबरोबरील इस्रायलचे सहकार्य म्हणजे इतिहासाकडे पाठ फिरविण्यासारखे असल्याची जळजळीत टीका रशियाने केली होती. यासंदर्भात रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेल्या विधानांवर रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिलगिरी व्यक्त केली. तरीही यामुळे इस्रायल व रशियामधील संबंध ताणले गेल्याचे जगासमोर आले होते.
पुढच्या कळात रशियाने हमासच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर फोनवरुन चर्चा केली व हमासच्या प्रतिनिधींनी रशियाला भेट दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. हा तणाव इथेच संपलेला नसून इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले असून या भेटीत युक्रेनच्या मुद्यावर आपल्या देशाची भूमिका स्पष्ट करू शकतात. त्याआधी रशियाने सिरियात इस्रायली विमानांवर एस-300 चा हल्ला चढवून इशारा दिल्याचे दिसत आहे.