वॉशिंग्टन/मॉस्को/किव्ह – सायबरहल्ले, जॅमिंग व इतर कारवायांच्या माध्यमातून रशिया युक्रेनखमधील ‘स्टारलिंक नेटवर्क’ नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप अमेरिकी उद्योजक एलॉन मस्क यांनी केला. मस्क यांच्या ‘स्पेसेक्स’ कंपनीकडून युक्रेनला सॅटेलाईट इंटरनेटची सेवा फुकटात पुरविली जात आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या निर्देशांवरुन हे करण्यात येत असल्याचे दावे रशियाने केले होते. दरम्यान, शनिवारी रात्री रशियाने लष्करी मोहिमेसाठी वापरण्यात येणाऱ्या दोन उपग्रहांचे प्रक्षेपण केल्याची माहिती दिली.
फेब्रुवारी महिन्यात रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. रशियाच्या या लष्करी मोहिमेदरम्यान रशियन संरक्षणदलांनी युक्रेनमधील सॅटेलाईट कम्युनिकेशन व इंटरनेट पुरविणारी यंत्रणा उद्ध्वस्त केली होती. त्यामुळे युक्रेनी लष्कराकडे स्वतंत्र सॅटेलाईट संपर्कयंत्रणा उपलब्ध नाही. अमेरिकेच्या संरक्षणविभागाने मस्क यांना निर्देश देऊन त्यांच्या ‘स्टारलिंक नेटवर्क’ची सेवा युक्रेनी लष्कराला पुरविण्यास सांगितले होते. त्यासाठी मस्क यांनी आतापर्यंत आठ कोटी डॉलर्सहून अधिक निधी खर्च केला आहे.
मस्क यांनी युक्रेनी लष्कराकडून स्टारलिंकसाठी कोणतेही पैसे आकारलेले नाहीत. मात्र काही दिवसांपूर्वी मस्क यांनी आपल्याला युक्रेनी लष्कराला मोफत सेवा पुरविणे शक्य होणार नसल्याचे बजावले होते. त्यानंतर अमेरिकेच्या संरक्षण विभागाने मध्यस्थी करून सेवा पुढे चालू ठेवण्यासाठी दबाव आणला होता. सध्या ही सेवा सुरू असली तरी त्यावर रशियाकडून मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. आपल्या कंपनीकडून सेवा पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असले तरी वाढत्या रशियन हल्ल्यांमुळे लवकरच युक्रेनमधील ‘स्टारलिंक नेटवर्क’ नष्ट होईल, असे मस्क यांनी बजावले आहे.
स्टारलिंक नेटवर्क बंद पडल्यास युक्रेनच्या संरक्षणदलांच्या क्षमतेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. स्टारलिंक बंद पडली तरी युक्रेनची मोठ्या प्रमाणात पिछेहाट होईल, असा दावा रशियन संसद सदस्यांनी केला आहे.