इस्लामाबाद – भारताने ‘आयटी’ अर्थात ‘इर्न्फोमेशन टेक्नॉलॉजी’मध्ये कौशल्य संपादन केले आहे. भारताचा शेजारी पाकिस्तान देखील ‘आयटी’मध्ये खूपच पुढे आहे. पण त्यांचे कौशल्य असलेली आयटी म्हणजे ‘इंटरनॅशनल टेररिझम’ अर्थात आंतरराष्ट्रीय दहशतवाद आहे, असे भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले होते. त्यांचे हे उद्गार पाकिस्तानला चांगलेच झोंबले आहेत. पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी, विश्लेषक व या देशातील पत्रकार देखील जयशंकर यांच्या विधानांमुळे खजिल झाल्याचे दिसत आहे. भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची ही विधाने अतिशय बेजबाबदार असल्याची टीका पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली.
जगातील दुसरा कुठलाही देश पाकिस्तानसारखा दहशतवादाचा वापर करीत नाही, ही बाब जयशंकर यांनी गुजरातच्या बडोदा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात लक्षात आणून दिली. दहशतवाद पसरविण्यात पाकिस्तानला लाभलेल्या या कौशल्याचा दाखला देऊन जयशंकर यांनी पुढच्या काळात पाकिस्तानला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला. पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिशी घालत आहे, 26/11चा हल्ला घडविणाऱ्या सूत्रधारांवर पाकिस्तानने अजूनही कारवाई केलेली नाही, याकडेही परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष वेधले. मात्र ही टीका व आरोप करीत असताना, जयशंकर यांनी पाकिस्तान थेट नामोल्लेख करण्याचे टाळले. भारताचा शेजारी व दहशतवादचा पुरस्कर्ता देश, अशारितीने जयशंकर यांनी पाकिस्तानचा उल्लेख केला.
त्यांच्या या विधानांवर पाकिस्तानातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पाकिस्तानच्या वृत्तवाहिन्यांनी जयशंकर यांच्या टीकेची दखल घेऊन भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आपल्या देशाचे वाभाडे काढले, अशी खंत व्यक्त केली. पाकिस्तानचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बसित यांनी जयशंकर यांनी केलेली ही टीका दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. भारत अशारितीने पाकिस्तानच्या विरोधात राजनैतिक प्रचाराची जोरदार मोहीम राबवत असून याला फार मोठे यश मिळत असल्याची खंत देखील अब्दुल बसित यांनी व्यक्त केली. तर पाकिस्तानातही जयशंकर यांच्या क्षमतेला दाद देणारा चाहतावर्ग असून ही सारी मंडळी जयशंकर यांनी केलेल्या टीकेमुळे नाराज झाल्याचा दावा काही पाकिस्तानी ब्लॉगर्सनी केला.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी जयशंकर यांच्या विधानांवर आक्षेप नोंदविला असून त्यांची ही विधाने बेजबाबदार व दिशाभूल करणारी असल्याची टीका केली. पाकिस्तान नाही, तर भारतच पाकिस्तानच्या विरोधातील दहशतवादासाठी सहाय्य करीत आहे व त्यासाठी भारत आपल्या भूमीचा वापर करीत असल्याचा हास्यास्पद आरोप पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. तसेच भारत काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करीत असल्याचे दावेही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ठोकले आहेत. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय शांततेसाठी पाकिस्तानने दिलेल्या योगदानाची दखल आंतरराष्ट्रीय समुदायाने घेतलेली आहे, अशी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.