एडन – अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने दहशतवादी संघटनेच्या यादीतून वगळल्यामुळे अधिकच आक्रमक झालेल्या हौथींनी येमेनमधील हल्ले तीव्र केले आहेत. काही तासांपूर्वीच हौथींनी येमेनच्या लष्कराला पिटाळून महत्त्वाच्या मारिब शहरावर ताबा घेतला. हौथींनी सुरू केलेल्या या हल्ल्यांवर बायडेन प्रशासनाने मवाळ प्रतिक्रिया दिली आहे. तर या हल्ल्यांमुळे सावध झालेल्या सौदी अरेबिया आणि सौदीच्या अरब मित्रदेशांनी येमेनमध्ये लष्कर तैनाती वाढविली आहे.
अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडून शस्त्रसहाय्य मिळणार्या हौथींना दहशतवादी संघटनांच्या यादीत सामील केले होते. पण ट्रम्प प्रशासनाने घेतलेले निर्णय फिरविणार्या राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी हौथींना दहशतवादी संघटनांच्या यादीतून वगळण्याचे संकेत दिले होते. त्याचबरोबर आतापर्यंत अमेरिकेकडून सौदीला पुरविण्यात येणार्या संरक्षणविषयक सहकार्यावरही फेरविचार करण्याची घोषणा बायडेन यांनी केली होती.
बायडेन प्रशासनाच्या या घोषणेमुळे आत्मविश्वास वाढलेल्या हौथी बंडखोरांनी या महिन्याच्या सुरुवातीपासून येमेनमधील हल्ले तीव्र केले आहेत. या हल्ल्यांमध्ये येमेनच्या लष्कराचे शेकडो जवान ठार झाल्याचा दावा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून हौथींनी चढविलेल्या हल्ल्यांवर अमेरिकेकडून कठोर प्रतिक्रिया अपेक्षित होती. पण राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी येमेनमधील संघर्ष संपविण्याची आवश्यकता असल्याचे सांगून हौथींना दहशतवादी संघटनेच्या यादीतून वगळल्याची घोषणा केली. असे करुन येमेनसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याचे दरवाजे उघडल्याचे बायडेन यांनी स्पष्ट केले.
पण बायडेन यांच्या घोषणेला काही तास उलटत नाही तोच हौथींनी येमेनमधील राष्ट्राध्यक्ष सालेह यांच्या सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या हदरामौत आणि शाब्वा या प्रांतांवर हल्ले चढविले. राजधानी सनापासून अवघ्या 75 मैल अंतरावर असलेले मारिब शहर गुरुवारी हौथींनी ताब्यात घेतले. मारिब शहर हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे मानले जाते. त्याचबरोबर मारिबमधील धरणावरही हौथींनी ताबा घेतला आहे. यावर प्रतिक्रिया देताना बायडेन प्रशासनाने हौथींना येमेनमधील संघर्ष थांबविण्याचे आवाहन केले. तर हौथींनी सुरू केलेला हिंसाचार रोखण्यासाठी सौदी अरेबिया आणि सौदीच्या अरब मित्रदेशांनी पुन्हा एकदा येमेनमध्ये आपल्या लष्करी हालचाली तीव्र केल्या आहेत. मारिब शहराला हौथींच्या तावडीतून सोडविण्यासाठी सौदीची लष्करी वाहने या ठिकाणी दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर सौदीची लढाऊ विमाने हौथींवर हवाई हल्ले चढविण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. यामुळे येमेनमधील संघर्ष भडकण्याची शक्यता वाढली आहे.
दरम्यान, हौथींना दहशतवादी संघटनेच्या यादीतून वगळल्यानंतर अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने या संघटनेबरोबर छुप्यामार्गाने चर्चा सुरू केली आहे. अमेरिकेने येमेनसाठी नियुक्त केलेले विशेषदूत टिम लेंडर्किंग यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा संदेश वेगळ्या मार्गाने हौथींपर्यंत पोहोचविला जात असल्याचे लेंडर्किंग यांनी म्हटले आहे.