इराणबरोबर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सौदी नौदलाचे अद्ययावतीकरण करीत आहे

रियाध – इराणबरोबरच्या अणुकराराबाबत अमेरिकेची डळमळीत भूमिका आणि इराणसंलग्न गटांचा अरब-आखाती देशांमधील वाढता प्रभाव, यामुळे पर्शियन आखातातील तणाव वाढत आहे. इराणचा हा धोका लक्षात घेऊन सौदी अरेबियाने आपल्या नौदलाचे अद्ययावतीकरण सुरू केले आहे. याचा भाग म्हणून सौदीने नौदलासाठी हवाई सुरक्षा यंत्रणेने सज्ज आणि पाणबुडी विरोधी युद्धासाठी सज्ज असलेल्या विनाशिकांची खरेदी केली आहे. यातील पहिली विनाशिका नुकतीच सौदीच्या नौदलात सामील झाली.

Saudi-Arabia-corvetteसौदी अरेबियाच्या ‘सौदी मिलिटरी इंडस्जि कंपनी’ आणि स्पेनच्या ‘नवांतिया’ या जहाज निर्मिती कंपनीमध्ये करार झाला होता. यानुसार, स्पेनची कंपनी सौदीला १०४ मीटर लांबीच्या पाच विनाशिका पुरविणार आहे. यातील पहिली विनाशिका काही दिवसांपूर्वीच सौदीच्या जेद्दाह बंदरातील किंग फैझल नौदलतळावर दाखल झाली. अवांते २००० श्रेणीतील ‘अल जुबैल’ ही विनाशिका बहुउद्देशीय असल्याचा दावा आखाती विश्लेषक करीत आहेत. सदर विनाशिका हवाई सुरक्षा यंत्रणा तसेच पाणबुडीभेदी यंत्रणेने सज्ज आहे.

पर्शियन आखात ते रेड सीपर्यंतच्या सागरी क्षेत्रातील आपल्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी सौदीने नौदलाच्या अद्ययावतीकरणाचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत अवांते श्रेणीतील विनाशिकांबरोबर विध्वंसिका, गस्तीनौका आणि वेगवान बोटींची खरेदी सौदीने सुरू केली आहे. यापैकी विनाशिका पर्शियन आखातात तैनात असतील. तर विध्वंसिका रेड सीच्या किनारपट्टीपासून एडनच्या आखातातून प्रवास करणाऱ्या सौदीच्या बोटींना सुरक्षा पुरवतील. येमेनमधील इराणसंलग्न हौथी बंडखोरांच्या हल्ल्यांपासून सुरक्षेसाठी ही तैनाती केली जाईल, असे पाश्चिमात्य विश्लेषकांचे म्हणणे आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये इराणने पर्शियन आखातापासून ते रेड सीच्या क्षेत्रातील आपला प्रभाव वाढविला आहे. इराणच्या विनाशिका आणि गस्तीनौकांनी इतर देशांच्या जहाजांवर हल्ले चढविल्याच्या घटना घडल्या होत्या. गेल्याच महिन्यात इराणच्या विनाशिकांनी युएईच्या जहाजाचे अपहरण केले होते. तर पर्शियन आखातातून गस्त घालणाऱ्या अमेरिकेच्या युद्धनौकेजवळून धोकादायक प्रवास केला होता. या पार्श्वभूमीवर, इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांविरोधी कारवाईसाठी सौदीने आपल्या नौदलाचे अद्ययावतीकरण सुरू केल्याचे दिसत आहे.

leave a reply