रियाध/लंडन – ‘सौदी अरेबिया जिहाद पुकारू शकतो, हे सौदी आणि सौदी राजघराण्याच्या अस्तित्वाला आव्हान देणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे’, अशी धमकी सौदीचे प्रिन्स सौद अल-शालान यांनी अमेरिकेला दिली. इंधनाच्या उत्पादनातील कपातीबाबत निर्णय घेणाऱ्या सौदीला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला होता. त्याचबरोबर सौदीचे लष्करी सहाय्य बंद करण्याची मागणी अमेरिकन सिनेटर्सनी उचलून धरली होती. या पार्श्वभूमीवर सौदीच्या प्रिन्स अल-शालान यांनी अमेरिकेला हा इशारा दिल्याचे दिसत आहे.
सौदी अरेबियाचे संस्थापक राजे अब्दुलअझिझ अल सौद यांचे नातू आणि सौदीचे सध्याचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचे चुलत भाऊ असलेल्या प्रिन्स सौद अल-शालान यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. इंग्रजी आणि फ्रेंच भाषेतील या व्हिडिओमध्ये प्रिन्स सौद यांनी थेट उल्लेख न करता अमेरिकेला धमकावले. सौदीला आव्हान देणाऱ्यांविरोधात जिहाद पुकारला जाईल, असा इशारा प्रिन्स सौद यांनी दिला. प्रिन्स सौद यांना सौदीच्या राजघराण्यात अधिकृत भूमिका नाही. त्यामुळे त्यांची विधाने वैयक्तिक पातळीवर असल्याचा दावा सौदी समर्थक करीत आहेत.
पण अमेरिका आणि सौदीच्या संबंधातील तणाव वाढत असताना प्रिन्स सौद यांनी केलेल्या विधानांना अमेरिका व ब्रिटनच्या माध्यमांनी महत्त्व दिले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला ‘ओपेक प्लस’च्या बैठकीत इंधनाच्या उत्पादनात प्रतिदिन 20 लाख बॅरल्सची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. रशियाबरोबर सहकार्य वाढविण्यासाठी सौदीने हा निर्णय घेतल्याचा आरोप करून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सौदीला गंभीर परिणामांचा इशारा दिला होता. याअंतर्गत सौदीबरोबरच्या संबंधांबाबत फेरविचार करण्याचे बायडेन यांनी बजावले होते.
पण गंभीर परिणामांचा इशारा देणाऱ्या बायडेन प्रशासनानेच आपल्याकडे महिनाभरासाठी इंधनाच्या उत्पादनातील ही कपात पुढे ढकलण्याची मागणी केल्याचे सौदीने उघड केले होते. अमेरिकेतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बायडेन प्रशासनाने सौदीकडे ही मागणी केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर बायडेन यांच्या डेमोक्रॅट पक्षातील सिनेटर्सनी सौदीला दिले जाणारे शस्त्रसहाय्य रोखावे, अशी मागणी केली. अमेरिकेच्या या भूमिकेनंतर ओपेक प्लस संघटनेतील बहुतांश देशांनी सौदीचे समर्थन केले होते. अशा परिस्थितीत, प्रिन्स सौद अल-शालान यांनी अमेरिकेला दिलेला इशारा महत्त्वाचा ठरतो.
दरम्यान, इंधनाच्या उत्पादनातील कपातीच्या निर्णयानंतर अमेरिका व सौदीतील संबंध अधिकच बिघडत चालल्याचा दावा अमेरिकी माध्यमे करीत आहेत. अमेरिकी उद्योजकांनी सौदीमध्ये गुंतवणूक करू नये, यासाठी बायडेन प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे अमेरिकी वृत्तवाहिनीचे म्हणणे आहे. तर सौदीमध्येच पार पडणाऱ्या ‘डावोस इन डेझर्ट’ या आंतरराष्ट्रीय आर्थिक बैठकीसाठी सौदीने बायडेन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आमंत्रण दिले नसल्याची माहिती समोर येत आहे.