तेहरान – इराण आणि सौदी अरेबियाच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये पहिली उघड चर्चा पार पडली. येत्या काळात इराणबरोबर आणखी चर्चा करण्यासाठी आपण तयार असल्याचे सौदीने म्हटले आहे. त्यामुळे येत्या काळात इराण व सौदीमध्ये बैठका पार पडतील, असा दावा इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन आमीर अब्दुल्लाहियान यांनी केला.
इराकमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जॉर्डनमध्ये अरब-इस्लामी देशांची ‘बगदाद कॉन्फरन्स’ ही महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये इराणचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्लाहियान तर सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल बिन फरहान अल सौद देखील सामील झाले होते. या बैठकीच्या निमित्ताने इराण व सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भेट घेऊन काही मुद्यांवर चर्चा केली. यानिमित्ताने सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इराणबरोबर लवकरच चर्चा सुरू होईल, असा दावा केला.
इराणच्या वादग्रस्त अणुकार्यक्रम यामुळे सौदीबरोबर याआधीच वाद पेटलेला आहे. त्यातच गेल्या तीन महिन्यांहून इराणमध्ये पेटलेल्या निदर्शनांसाठी सौदी जबाबदार असल्याचा ठपका इराणने ठेवला होता. त्यामुळे जॉर्डन येथील बैठकीत दोन्ही देशांमध्ये चर्चा शक्य नसल्याचे बोलले जात होते. पण सौदी सविस्तर चर्चेसाठी तयार असल्याचे सांगून इराणने खळबळ उडवून दिली आहे.