‘सोशल स्टॉक एक्सचेंज’साठी सेबीची तत्त्वता मंजुरी

मुंबई – भारतीय शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणारी संस्था असलेल्या सेबीने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला विशेष सोशल स्टॉक एक्सचेंज (एसएसई) सुरू करण्यास तत्त्वता मान्यता दिली आहे. यामुळे धर्मदाय संस्था, सामाजिक संस्था व सामाजिक उपक्रमांना या ‘एसएसई’च्या माध्यामातून सामान्य जनता व गुंतवणूकदारांकडून निधी उभारता येईल. यासंदर्भातील गाईडलाईन्स सेबीने जारी केल्या आहेत. ‘एसएसई’ची स्थापना ही ऐतिहासिक घटना ठरेल, असा दावा केला जात आहे. याआधी ब्रिटन, कॅनडा, ब्राझिलसारख्या काही देशांमध्ये अशी ‘एसएसई’ कार्यरत आहेत.

sebi2020 सालच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील सामाजिक उपक्रमांना निधीची कमतरता पडू नये, तसेच निधी उभारण्यामध्ये पारदर्शता यावी व दुरुपयोग टळावा, यासाठी सोशल स्टॉक एक्सचेंजची स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या पार्श्वभूमीवर सिक्युरिटी ऑफ एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) या भारतीय शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्थेने यासंदर्भात पुढील कारवाई करण्यासाठी एका कार्यकारी समितीची स्थापना केली होती. यामध्ये सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अर्थमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच शेअर बाजाराचे तज्ज्ञांचा समावेश होता. याच कार्यकारी समितीने नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन अर्थात ना नफा तत्त्वावर काम करणाऱ्या संस्थांना (एनपीओ) सोशल स्टॉक एक्सचेंजवर नोंदणीकृत करण्याची शिफारस केली होती. यासदंर्भात गेल्या महिन्यात काही अटिंसह एनपीओंना सोशल स्टॉक एक्सचेंजवर नोंदणीसाठी एक चौकट आखून दिली आहे. तसेच देशातील सर्वात जूना शेअर बाजार असलेल्या बीएसई अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला ‘एसएसई’ सुरू करण्याची तत्त्वता मान्यता दिली आहे.

देशात मोठ्या प्रमाणावर एनपीओ कार्यरत आहेत. विविध क्षेत्रात या एनपीओ कार्यरत असून विविध माध्यमातून त्यांच्या सामाजिक कार्यासाठी निधीची उभारणी होत असते. मात्र हा निधी उभारणे कठीण काम असून बरेच अडथळेही यामध्ये येतात. मात्र लोककल्याणांच्या कामांना निधीची कमतरता होऊ नये, सामान्य नागरिकांच्या भल्यासाठी झटणाऱ्या संघटना असा निधी सहजतेने उभा करता यावा यासाठी त्यांना या ‘एसएसई’मध्ये सूचिबद्ध केले जाईल. सध्या 15 सामाजिक कार्यांसाठी ‘एसएसई’च्या माध्यमातून एनपीओ, एनजीओंना निधी उभारण्याची मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेअर ट्रेडिंंगच्या स्टॉक एक्स्चेंज अर्थात शेअर बाजारापेक्षा सोशल स्टॉक एक्सचेंज संपूर्णपणे भिन्न असेल. मात्र ते निधी उभारणीसाठी शेअर बाजाराप्रमाणेच काम करेल. ब्रिटन, ब्राझिल, कॅनडासह काही देशात अशी सोशल स्टॉक एक्सचेंज अस्तित्वात आहेत. आरोग्य, पर्यावरण व वाहतूक उद्योग उपक्रमांमध्ये गुंतलेल्या व्यवसायांना जोखीम भांडवल उभारण्याची परवानगी देतात.

सेबीने घातलेल्या अटीनुसार ‘एसएसई’वर सूचिबद्ध होण्यासाठी एनपीओंना धर्मदाय संस्था म्हणून किमान तीन वर्ष नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच वर्षाला किमान 50 लाख रुपये सामाजिक कार्यावर खर्च करणाऱ्या, तसेच गेल्या आर्थिक वर्षात किमान दहा लाख रुपयाचा निधी उभ्या करणाऱ्या संस्थांना ‘एसएसई’वर सूचिबद्धतेसाठी अट घालण्यात आली आहे. देशात 30 लाखांच्या आसपास एनपीओ आहेत. याचा अर्थ प्रत्येक 400 नागरिकांमध्ये एक एनपीओ देशात कार्यरत आहे. एसएसईचा उद्देश नफा कमविणे नसून सामाजिक कल्याणाच्या कामांना बळ देण्याचा असल्याचे सांगण्यात येते.

leave a reply