बर्लिन/बेलग्रेड – आंतरराष्ट्रीय मुद्यांवर युरोपिय महांघाच्या धोरणांशी एकमत असले तरच सर्बियाला महासंघाचे सदस्यत्व मिळू शकेल. तसे नसेल तर सर्बियाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा जर्मनीने सर्बियाला दिला आहे. रशिया-युक्रेन संघर्षाच्या मुद्यावर रशियाविरोधात भूमिका घेण्यास सर्बियाने नकार दिला होता. उलट सप्टेंबर महिन्यात रशियाबरोबर राजनैतिक व परराष्ट्र पातळीवरील सहकार्य वाढविणारा करार करण्यात आला होता. यामुळे युरोपिय देशांमध्ये अस्वस्थता असून जर्मनीने दिलेला इशारा त्याचाच भाग दिसत आहे.
सर्बिया २००९ सालापासून युरोपिय महासंघाच्या सदस्यत्वासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र अद्यापपर्यंत युरोपिय महासंघाने त्याला विशेष प्रतिसाद दिलेला नाही. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनला महासंघाचे सदस्यत्व देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याचवेळी युक्रेनपूर्वी सदस्यत्वासाठी प्रयत्न करणाऱ्या देशांचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. गेल्या महिन्यात सर्बियाच्या वरिष्ठ मंत्र्यांनी महासंघातील आघाडीच्या सदस्य देशांकडून कोसोवोच्या मान्यतेच्या बदल्यात महासंघात सामील करण्याचा प्रस्ताव आल्याचा दावा केला होता.
सर्बिया युरोपचा भाग असला तरी रशियन प्रभावाखालील देश म्हणून ओळखण्यात येतो. इंधन, संरक्षण यासारख्या क्षेत्रात दोन देशांमध्ये घनिष्ठ सहकार्य आहे. रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतरच्या काळात सर्बियाच्या नेत्यांनी रशियाला भेटही दिली होती. ही बाब युरोपिय महासंघाला खटकत असून आता थेट परिणामांचा इशारा देण्यापर्यंत संबंध टोकाला गेल्याचे दिसत आहे. दरम्यान, जर्मनीकडून इशारा देण्यात येत असतानाच सर्बिया व कोसोवोमधील तणाव पुन्हा चिघळण्याचे संकेत मिळाले आहेत. सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुकिक यांनी आपल्या संरक्षणदलांना अलर्टवर राहण्याचे आदेश दिल्याचे समोर आले आहे.