शाहबाज शरीफ पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारण्याच्या तयारीत

शाहबाज शरीफइस्लामाबाद – अविश्‍वासदर्शक ठरावाद्वारे, संसदीय मार्गाने सत्तेवरून खाली खेचण्यात आलेले पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान, असा विक्रम इम्रान खान यांच्या नावावर लागला आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे बंधू व पंजाब प्रांताचे माजी मुख्यमंत्री शहाबाज शरीफ आता पाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनतील. सोमवारी संसदेत त्यांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगितले जाते. इम्रान खान यांच्या सरकारचा अंत झाल्याने पाकिस्तानने सुटकेचा निःश्‍वास टाकल्याचा दावा राजकीय पक्षनेते व माध्यमेही करीत आहेत. पाकिस्तानात या सार्‍या घडामोडी सुरू असताना, इम्रान खान यांनी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांना बडतर्फ करून आपले सरकार वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. यामुळे इम्रान खान यांच्यासमोरील अडचणींमध्ये अधिकच वाढ झाली आहे. ते पाकिस्तान सोडून पळ काढू नये, यासाठी हालचाली सुरू झाल्याचे दावे केले जातात. मात्र आपण सत्तेवर आल्यानंतर सूडाचे राजकारण करणार नाही, असे शाहबाज शरीफ यांनी जाहीर केले.

आमचे सरकार कुणावरही सूड घेणार नाही, पण कायदा आणि न्याय आपले काम करील, असे सूचक उद्गार शरीफ यांनी काढले. इम्रान खान यांच्या नया पाकिस्तानच्या घोषणेमुळे झालेली वाताहत लक्षात घेता, जनतेचे आत्ताच्या ‘पुराना पाकिस्तान’मध्ये स्वागत असो, असा टोला पाकिस्तान पिपल्स पार्टीचे प्रमुख नेते बिलावल भुत्तो यांनी लगावला. इम्रान खान यांचे सरकार पाडून त्याजागी नवे सरकार आणण्यासाठी प्रमुख विरोधी पक्ष एकत्र आले असून शाहबाज शरीफ त्यांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. पण त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचे दाखले देऊन इम्रान खान यांचे सहकारी त्यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध करीत आहेत.

भ्रष्ट व दुसर्‍या देशांच्या इच्छेने सत्तेवर येत असलेले हे सरकार पाकिस्तानसाठी दुर्दैवाची बाब ठरेल, असे इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते फवाद चौधरी यांनी म्हटले आहे. तर इम्रान खान यांनी पाकिस्तानचा दुसरा स्वातंत्र्यलढा सुरू झाल्याचे दावे सोशल मीडियावर केले आहेत. अफगाणिस्तानातील युद्धात सहभागी होण्याची शाहबाज शरीफमागणी इम्रान खान यांनी नकारली होती. रशियाला भेट न देण्याचा अमेरिकेचा इशाराही त्यांनी धुडकावून लावला. अशारितीने पाकिस्तानचे सार्वभौमत्त्व जपणार्‍या इम्रान खान यांना अमेरिकेनेच सत्तेवरून खाली खेचले व आपल्या मर्जीतले सरकार अमेरिका पाकिस्तानवर लादत आहे, असे दावे इम्रान खान यांचे सहकारी करीत आहेत.

दरम्यान, इम्रान खान यांच्या कट्टर भारतविरोधी भूमिकेमुळे भारताचे पाकिस्तानबरोबरील संबंध विकोपाला गेले होते. पण आता नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर दोन्ही देशांचे राजनैतिक संबंध नव्याने प्रस्थापित होतील, असा दावा केला जातो. भारताबरोबरील संबंध सुधारण्यासाठी त्यावेळचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केलेले प्रयत्न, हे त्यांच्या गच्छंतीचे प्रमुख कारण मानले जात होते. पण पाकिस्तान भयंकर आर्थिक, राजकीय संकटात सापडलेला असताना, पाकिस्तानच्या लष्करालाच आता भारताबरोबर सहकार्य हवे आहे. या लष्करातील कट्टरवादी गट याला विरोध करीत असला तरी जनरल बाजवा यांना भारताबरोबर सहकार्य अपेक्षित असल्याचे दावे केले जातात. त्यामुळे नजिकच्या काळात राजकीय इच्छाशक्ती दाखविल्यास शाहबाज शरीफ व त्यांना पाठिंबा देणार्‍या पक्षांमुळे भारत व पाकिस्तानच्या संबंधांमध्ये काही अंशी सुधारणा होऊ शकते. मात्र पाकिस्तानातील कट्टरपंथीय याविरोधात जहाल भूमिका घेण्याची दाट शक्यता आहे.

leave a reply