तेहरान – गेल्या दोन महिन्यांपासून इराणमधील राजवटीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर रिव्होल्युशनरी गार्ड्सने केलेल्या कारवाईत ३४४ जणांचा बळी गेला आहे. तर जवळपास १६ हजार जणांना अटक करण्यात आली आहे. तर निदर्शनात सहभागी झालेल्या दोन जणांना इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. पण निदर्शनांवर याचा परिणाम झालेला नाही. उलट इराणमधील व्यापारीवर्गाने तीन दिवसांचा बंद पुकारून या आंदोलनाला पाठिंबा दिला. इराणमधील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या फुटबॉलपटूंनीही कतारमधील वर्ल्डकप स्पर्धेचे आमंत्रण धुडकावून निदर्शकांना आपले समर्थन दिले.
मंगळवारी रात्री इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी कुर्दवंशियांची वस्ती असलेल्या भागात केलेल्या कारवाईत तीन निदर्शकांचा बळी गेला. अशारितीने इराणच्या यंत्रणा कठोर कारवाई करून ही निदर्शने मोडून काढण्याचा प्रयत्न करीत असले, तरी निदर्शकांच्या निर्धारावर त्याचा परिणाम झालेला नाही. उलट विविध स्तरावरून या निदर्शनांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसते. मंगळवारपासून इराणमधील व्यापारीवर्गाने या निदर्शनांना समर्थन जाहीर करून तीन दिवसांचा बंद पुकारला आहे. राजधानी तेहरानमधील ग्रँड बाझारसह देशभरातील इतर शहरांमधील घाऊक तसेच किरकोळ बाजार देखील बंद करण्यात आले होते. तीन दिवसांसाठी बंदची घोषणा केली असली तरी यात वाढ होऊ शकते, असे संकेत व्यापारी देत आहेत.
याच्या पुढच्या टप्प्यात इराणमध्ये राष्ट्रीय संपाची हाक दिली जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. इराणच्या सोशल मीडियावरून जनतेने कुठल्याही स्वरुपाची खरेदी वा विक्री करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. यामुळे अप्रत्यक्ष कराच्या स्वरूपात इराणच्या राजवटीला मिळणारा महसूल बंद होईल आणि राजवट गुडघ्यावर येईल, असा दावा करण्यात येतो. त्यामुळे निदर्शक इराणच्या राजवटीची आर्थिक कोंडी करण्यावरही गांभीर्याने विचार करीत असल्याचे दिसत आहे.
सोशल मीडियावर व्यापाऱ्यांनी केलेल्या बंदचे व्हिडिओज् प्रसिद्ध झाले असून यातील एका व्हिडिओमध्ये इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. इराणमध्ये आयातुल्ला खामेनी यांचा अनादर करणाऱ्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. हे ठाऊक असूनही निदर्शकांनी एकेरी उल्लेख करण्याचे धारिष्ट्य दाखविले, याचे इराणमधील निदर्शकांच्या समर्थकांकडून स्वागत केले जात आहे.
दरम्यान, आपल्या देशात भडकलेल्या दंगलीसाठी अमेरिका, युरोपिय देश, सौदी अरेबिया आणि इस्रायल जबाबदार असल्याचा ठपका इराणने ठेवला आहे. इराणमधील सरकारविरोधात आंदोलन भडकविण्यासाठी सहाय्य करणाऱ्या परदेशी एजंट्सना ताब्यात घेतल्याचा दावा इराणची सुरक्षा यंत्रणा करीत आहे. फ्रान्सच्या आठ एजंट्सचा यात समावेश असल्याचे इराणचे म्हणणे आहे. त्याचबरोबर इराणच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप केल्याचा आरोप करून इराणने ऑस्ट्रेलियन राजदूतांना समन्स बजावले आहेत. गेल्याच आठवड्यात इराणने सौदी अरेबियाला गंभीर परिणामांचा इशारा दिला होता.