नवी दिल्ली – दिल्लीत आणि गुजरातमध्ये कोरोनामुळे परिस्थिती बिघडत असल्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. दिल्लीमध्ये आणि गुजरातमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि सर्व राज्य सरकारांकडे अहवाल मागविला आहे. कोरोनाची साथ रोखण्यासाठी काय पावले उचलली, अशी स्पष्ट विचारणा न्यायालयाने सरकारांना केली आहे. महाराष्ट्र सरकारलाही डिसेंबरमध्ये स्थिती आणखी खराब होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर काय तयारी केली याचे तपशील देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या साथीचे संक्रमण पुन्हा वाढू लागले आहे. दिल्लीत गेल्या दोन आठवड्यांपासून या साथीच्या रुग्णांची संख्या आणि होणारे मृत्यू अचानक वाढू लागले आहेत. त्यामुळे दिल्लीत काही भागांमध्ये पुन्हा संचार निर्बंध लावण्याची वेळ ओढवली आहे. चार हजारपेक्षा अधिक काँटेन्मेन्ट झोन बनविण्यात आले आहेत.
दिवाळीनंतर देशात इतर राज्यांमध्येही रुग्ण वाढत असल्याची नोंद झाली आहे. गुजरातमध्ये काही शहरांमध्ये रात्रीचा कर्फ्यू लावण्यात आला आहे. महाराष्ट्रातही दरदिवशी आढळणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेली आहे. देशात कोरोनाने बिघडत असलेल्या परिस्थीची दखल घसर्वोच्च नायायालयाने घेतली. याहून खराब स्थिती उदभविल्यास काय तयारी करण्यात आली आहे, याबाबत दोन दिवसात अहवाल सादर करा असे निर्देश न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना दिले आहेत.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला सध्या चाचण्या कमी का होत आहेत, असा जाबही विचारला आहे. यावेळी केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल संजय जैन यांनी सर्वोच्च न्यायालयाने याआधी दिलेल्या निर्देशांचे पालन केले असल्याची माहिती न्यायालयाला दिली. यानुसार विशेष समितीही बनविण्यात आल्याचे केंद्र सरकारने सांगितले.