अंकारा – तुर्कीच्या इस्तंबूल शहरात रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा बळी गेला तर ८१ जण जखमी झाले. राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले असून तुर्कीच्या सुरक्षा यंत्रणांनी या हल्ल्यासाठी ‘कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी-पीकेके’ या संघटनेवर संशय व्यक्त केला. आत्तापर्यंत तुर्कीच्या सुरक्षा यंत्रणांनी या हल्ल्याप्रकरणी ४६ संशयितांना ताब्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून तुर्कीने इराक, सिरियातील कुर्दांच्या ठिकाणांवर हल्ले चढविले आहेत. यावर पीकेकेकडून ही प्रतिक्रिया आल्याचा दावा केला जातो.
इस्तंबूल शहरातील तक्सीम चौकाजवळील इस्तीकलाल मार्गावर रविवारी दुपारी फ्रेंच वकिलातीपासून ३०० मीटर अंतरावर हा स्फोट झाला. या स्फोटानंतर गोळ्यांचे आवाज ऐकू आल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. पण घटनास्थळावरील गोळीबाराबाबतचे कुठलेही तपशील उघड झालेले नाहीत. या स्फोटासंबंधी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर रविवारी संध्याकाळी तुर्कीच्या सुरक्षा यंत्रणेने या हल्ल्यासाठी जबाबदार संशयिताला ताब्यात घेतल्याचे जाहीर केले. तुर्कीच्या यंत्रणांनी या संशयिताची माहिती देण्याचे टाळून रविवारच्या हल्ल्यांसाठी ‘कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी-पीकेके’ला जबाबदार धरले आहे.
तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगून या स्फोटामागे महिला असल्याचा संशय व्यक्त केला. तसेच घातपातासाठी जबाबदार असलेल्या गटांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला. यानंतर एर्दोगन बाली येथील जी२० बैठकीसाठी रवाना झाले. तुर्कीचे गृहमंत्री तसेच इतर यंत्रणांनी या हल्ल्यासाठी पीकेकेवर ठपका ठेवला. या स्फोटानंतर तुर्कीच्या यंत्रणांनी अपप्रचार रोखण्यासाठी काही तासांसाठी सोशल मीडियावर बंदी टाकली होती.
सहा जणांचा बळी घेणाऱ्या या स्फोटावर भारत, सौदी अरेबियाने चिंता व्यक्त केली. तर अमेरिकेचा शोकसंदेश स्वीकारणार नसल्याची घोषणा तुर्कीने केली. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, तुर्कीने हा निर्णय घेतल्याचा दावा केला जातो. तसेच या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तुर्की आपल्या सहकारी देशांबरोबर चर्चा करीत असल्याची माहिती तुर्कीचे अंतर्गत सुरक्षामंत्री सुलेमान सोयलू यांनी दिली.
अल कायदा, आयएस तसेच पीकेकेने गेल्या काही वर्षांपासून तुर्कीत झालेल्या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती. २०१६ सालानंतर इस्तंबूल शहरात झालेला हा सर्वात मोठा हल्ला ठरला आहे. सहा वर्षांपूर्वी आयएसने इस्तंबूल शहरात इस्रायली पर्यटकांना लक्ष्य केले होते. यामध्ये पाच जणांचा बळी गेला होता. त्यानंतर तुर्कीमध्ये मोठे दहशतवादी हल्ले झाले नव्हते. पण तरीही देशाच्या सुरक्षेसाठी ‘पीकेके’ ही कुर्द सशस्त्र संघटना जबाबदार असल्याचा आरोप करून तुर्कीने गेल्या काही महिन्यांपासून कुर्द संघटनांवर कारवाई सुरू केली होती. तुर्कीच्या आग्नेय भागासह इराक, सिरियातील पीकेके व संलग्न कुर्द संघटनांना तुर्कीच्या सुरक्षा यंत्रणा हल्ले चढवित आहेत. इराकच्या हवाईहद्दीत घुसून तुर्कीने हल्ले चढविल्याचे समोर आले होते. रविवारच्या स्फोटानंतरही तुर्कीने कुर्दवंशियांची बहुसंख्या असलेल्या आपल्या भूभागात हेलिकॉप्टर्स तैनात केल्याच्या बातम्या आल्या आहेत.