श्रीनगर – शनिवारी जम्मू-काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यात सुरक्षादलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले असून गेल्या २४ तासात सहा दहशतवादी ठार झाले आहेत. त्याचवेळी शुक्रवारी रात्री पाकिस्तानी लष्कराने पुंछ जिल्ह्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या हल्ल्यात तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
शोपियन जिल्ह्यात आम्शीपोरा गावात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि सीआरपीएफने या भागात शोध मोहीम हाती घेतली. दहशतवादी येथील एक घरात लपून बसले होते. सुरक्षादलाने घराला वेढा घालून दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगितले. मात्र दहशवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी उडालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात सुरक्षादलाला यश आले. या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शुक्रवारी कुलगाममधील नागनाद-चिम्मर भागात सुरक्षादलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये ‘आयईडी ‘ बनवण्यात तज्ज्ञ असलेल्या दहशतवाद्याचा समावेश आहे. या चकमकीत तीन जवान देखील जखमी झाले होते.
शुक्रवारी रात्री पुंछ जिल्ह्यातील गुलपूर सेक्टर आणि खरी करमाडा भागात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार तसेच मॉर्टर्सने हल्ले केले. या हल्यात तीन नागरिक ठार झाले असून ते एकाच कुटुंबातील आहेत. पाकिस्तानी लष्कराकडून शुक्रवारी संध्याकाळी गुलपूर सेक्टरमध्ये गोळीबार करत नियंत्रणरेषेवरील चौक्यांना लक्ष्य करण्यात आले. त्याचवेळी खरी करमाडा भागातील लष्कराच्या चौक्यांवर गोळीबारही करण्यात आला. भारतीय लष्करानेही पाकच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले. रात्री उशिरापर्यंत हा गोळीबार सुरू होता.
गेल्या काही महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षादलाने दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी सहाय्य करण्यासाठी पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार करण्यात येत असतो. मात्र भारतीय सुरक्षादलाकडून दहशतवाद्यांचे असे घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यात आले आहेत. यावर्षी सुरक्षादलांनी १३७ दहशतवाद्यांना ठार केल्याची माहितीही देण्यात आली आहे.