रशियाविरोधातील ‘ऑईल बॅन’ स्लोव्हाकिया व हंगेरीने नाकारला

ब्रुसेल्स/मॉस्को – युरोपिय महासंघाकडून प्रस्तावित करण्यात आलेला रशिया ऑईल बॅन स्लोव्हाकिया व हंगेरी या सदस्य देशांनी नाकारला आहे. स्लोव्हाकियाने रशियाच्या कच्च्या तेलाला पर्याय देण्यासाठी किमान तीन वर्षांच्या कालावधीची मागणी केली. तर हंगेरीने ‘ऑईल बॅन’च्या प्रस्तावात आपल्याला इंधनसुरक्षा देण्याचा मुद्दा नसल्याचे सांगून प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे महासंघाचा प्रस्ताव अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘ऑईल बॅन'युरोपिय महासंघ रशियाकडून दररोज 35 लाख बॅरल्सहून अधिक कच्चे तेल व पेट्रोलियम उत्पादने आयात करतो. यात युरोपियन ट्रक्सकडून वापरण्यात येणाऱ्या डिझेलचाही समावेश आहे. या आयातीसाठी महासंघाकडून रशियाला प्रतिदिन 45 कोटी युरो चुकते करण्यात येतात. रशियाकडून युक्रेनमध्ये सुरू असलेल्या मोहिमेत या निधीचा वापर होत असल्याचे आरोप युक्रेनसह अमेरिका, ब्रिटन व काही युरोपिय देशही करीत आहेत.

त्यामुळे आता युरोपिय महासंघाने रशियाकडून आयात करण्यात येणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव समोर आणला आहे. मात्र त्यालाही विरोध होत असून हंगेरी व स्लोव्हाकिया त्यात आघाडीवर आहेत. 2020 सालच्या आकडेवारीनुसार स्लोव्हाकिया रशियाकडून दररोज एक लाख, 11 हजार बॅरल्स कच्चे तेल आयात करतो. तर हंगेरीकडून 76, 700 बॅरल्स तेलाची आयात होते. या दोन्ही देशांना रशिया ‘ड्रुझ्बा पाईपलाईन’च्या माध्यमातून कच्चे तेल पुरवितो.

रशियाकडून आयात होणाऱ्या या तेलाला पर्याय देण्यास किमान तीन वर्षांचा कालावधी आवश्यक असल्याचे स्लोव्हाकियाने म्हटले आहे. महासंघाने दिलेल्या कालावधीत रशियन तेलाचा पर्याय शोधणे शक्य नसल्याने या बंदीतून आपल्याला वगळण्यात यावे, अशी आग्रही मागणी स्लोव्हाकियाने केली. स्लोव्हाकिया हा युक्रेनचा समर्थक असतानाही करण्यात आलेली ही मागणी लक्ष वेधून घेणारी ठरते.

महासंघाच्या प्रस्तावात हंगेरीच्या इंधनसुरक्षेचा मुद्दा नसल्याने हंगेरी रशियावरील ‘ऑईल बॅन’चे समर्थन करणार नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

leave a reply