वॉशिंग्टन/बीजिंग – कोरोना तसेच उघूरवंशियाबद्दल चुकीची माहिती पसरविणार्या चीनच्या अपप्रचार मोहिमेवर ट्विटर, फेसबुक व इन्स्टाग्रामने कारवाई केली आहे. ट्विटरने दोन हजारांहून अधिक अकाऊंट बंद केले असून फेसबुक व इन्स्टाग्रामने ६००हून अधिक अकाऊंटस्वर कारवाइे केल्याचे सांगितले आहे. सोशल मीडिया कंपन्यांच्या या कारवाईमुळे चीनच्या सत्ताधारी राजवटीकडून चालविण्यात येणार्या प्रचारमोहिमेचे खरे स्वरुप उघड झाल्याचे सांगण्यात येते.
चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीकडून आपला प्रभाव वाढविण्यासाठी तसेच विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी आक्रमक प्रचारमोहिम राबविली जाते. चीन यासाठी सोशल मीडिया तसेच परदेशातील प्रसारमाध्यमांचा वापर करीत असल्याचे यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या अहवालांमधून समोर आले होते. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर चीनच्या या मोहिमेला अधिकच वेग आल्याचे दिसून आले होते.
काही महिन्यांपूर्वीच, कोरोना साथीच्या उगमाची पुन्हा चौकशी करावी, ही भूमिका अमेरिकेच्या दबावामुळे स्वीकारण्यात आली, असा दावा करणार्या चिनी प्रसारमाध्यमांचे पितळ उघडे पडले होतेे. चीनच्या सरकारी माध्यमांनी ‘विल्सन एडवर्डस्’ नावाच्या स्विस शास्त्रज्ञाच्या वक्तव्यांच्या आधारे ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ व अमेरिकेवर हे आरोप केले होते. मात्र प्रत्यक्षात या नावाचा शास्त्रज्ञ अस्तित्त्वातच नसल्याचे स्विस दूतावासाने स्पष्ट करून चिनी माध्यमांनी ‘फेक न्यूज’ मागे घ्याव्यात, असे बजावले होते. या घटनेमुळे कोरोनाच्या साथीबाबत चीनकडून करण्यात येणार्या खोट्या प्रचाराचा प्रयत्न फसला होता.
कोरोनाबरोबरच झिंजिआंगमधील उघूरवंशिय, हॉंगकॉंगमधील लोकशाहीवादी आंदोलन, तिबेट तसेच तैवानच्या मुद्यावर चीनच्या राजवटीने आक्रमक प्रचारमोहीम सुरू केली होती. या मुद्यांवरील खोटी माहिती सोशल मीडिया अकाऊंट्स तसेच ग्रुप्सच्या माध्यमातून पसरविण्यात येत होती. पाश्चात्य देशांवर दोषारोप करून त्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी चीनकडून विविध प्रकारे अपप्रचार करण्यात येत होता. यासंदर्भातील तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर आल्याने ट्विटर, फेसबुक व इन्स्टाग्रामने कारवाई केल्याचे स्पष्ट झाले आहे.
ट्विटरने दोन हजारांहून अधिक अकाऊंटस्चा समावेश असणारी दोन नेटवर्क्सवर कारवाई केल्याची माहिती दिली आहे. तर फेसबुकने ५२४ अकाऊंटस्, २० पेजेस, चार ग्रुप्सवर कारवाई केली. इन्स्टाग्रामने चीनशी संबंधित ८६ अकाऊंटस् बंद केल्याचे सांगितले आहे.