इटानगर – अरूणाचल प्रदेशच्या चांगलांग जिल्ह्यात बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात आसाम रायफलच्या जवानाला वीरमरण आले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुठल्याही संघटनेने घेतलेली नाही. मात्र ‘युनायटेड लिब्रेशन फ्रन्ट ऑफ आसाम’चा (उल्फा-इंडिपेंडन्ट) परेश बरुआ गट आणि ‘नॅशनल सोशलिस्ट काऊन्सिल ऑफ नागालँड-खापलांग’ (एनएससीएन-के) ही बंडखोरी संघटना यामागे असल्याचा संशय व्यक्त केला जातो.
रविवारी चांगलांग जिल्ह्यातील टेंगमो गावात बंडखोरांनी हल्ला घडवून आणला आहे. हे गाव इटानगरपासून ३०० किमी अंतरावर आहे. आसाम रायफल्सचे जवान पाण्याचा टँकर घेऊन जात असताना दबा धरून बसलेल्या बंडखोरांनी या हॅण्डग्रेनेड स्फोट घडवून आणला आणि जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये आसाम रायफल्सचा एक जवान शहीद झाला, तर एक जण जखमी झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
परेश बरुआची ‘उल्फा’ आणि ‘एनएससीएन’के’च्या ३०-३५ बंडखोरांचा वावर या भागात आहे. ११ जुलै रोजी म्यानमारच्या सीमेला लागून अरूणाचल प्रदेशच्या लोंगडिंग जिल्ह्यात सुरक्षादलाने एनएससीएन-के गटाच्या बंडखोरांना मारले होते. तेव्हापासून बंडखोर सुरक्षा दलावर हल्ला करण्याची योजना आखत होते, अशी माहिती समोर येत आहे. तसेच या हल्ल्याकडे भारत आणि चीनमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे. सीमेवरील वाढविलेल्या तणावानंतर चीन ईशान्य भारतातील बंडखोरी संघटनांच्या साहाय्याने येथे अशांतता माजविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे अहवाल प्रसिद्ध झाले होते .
ईशान्य भारतातील बंडखोरी कारवाया मोडून काढण्यात सुरक्षादलांना गेल्या काही वर्षात यश मिळाले आहे. प्रमुख बंडखोरी संघटना सरकारबरोबर शांती चर्चेत सहभागी झाल्या आहेत. शेकडो दहशतवादी शरण आले असून अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. मात्र उल्फा आणि एनएससीएन सारख्या बंडखोर संघटनातून बाहेर पडलेले आणि अहिंसेचा मार्ग न सोडणारे काही गट ईशान्य भारतात स्थापन झालेली शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या गटांना चीनकडून सहाय्य मिळत असल्याचे वारंवार समोर आले आहे.
दरम्यान, अरुणाचल प्रदेशच्या तिरप, चांगलांग आणि लोंगडिंग जिल्हे आसाम, नागालॅड आणि म्यानमारला लागून आहे. या भागात बंडखोरी संघटना हिंसक कारवाया करण्याच्या प्रयत्नात आहेत. म्हणूनच सरकारने या भागात सशस्त्र बल विशेष अधिकार अधिनियम (आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट-आफ्स्पा) लावला आहे. दोनच दिवसापूर्वी केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशातील तीन जिल्हे आणि अन्य तीन जिल्ह्यातील चार पोलीस स्थानकाला पुढील सहा महिन्यासाठी ‘आफ्स्पा’ कायद्याअंतर्गत ‘अशांत क्षेत्र’ घोषित केले आहे. सरकारने हा निर्णय बंडखोर संघटनेच्या वाढत्या कारवाया आणि कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन घेतला आहे.