साऊथ चायना सी क्षेत्रात चीनचे सामर्थ्यप्रदर्शन

सामर्थ्यप्रदर्शनबीजिंग/हनोई – सार्‍या जगाचे लक्ष रशिया-युक्रेन युद्धाकडे लागलेले असताना, चीनने साऊथ चायना सीच्या क्षेत्रात सामर्थ्यप्रदर्शन सुरू केले आहे. चीनने या सागरी क्षेत्रात मोठ्या सरावाची घोषणा केली असून आठवडाभर हा सराव चालणार आहे. या काळात चीनच्या हैनान ते व्हिएतनामपर्यंतचे क्षेत्र वाहतुकीसाठी बंद असेल, असे चीनने जाहीर केले. आपल्या शेजारी देशांना धाकात ठेवण्यासाठी चीनने हा सराव आयोजित केल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत. तर चीनने आपल्या शेजारी देशांच्या अधिकारांचा आदर करावा, असे व्हिएतनामने सुनावले आहे.

चीनच्या ‘हैनान मेरिटाईम सेफ्टी ऍडमिनिस्ट्रेशन’ने काही दिवसांपूर्वी साऊथ चायना सीच्या क्षेत्रात नौदल सरावाची घोषणा केली. दोन दिवसांपूर्वी सुरू झालेला हा सराव १५ मार्चपर्यंत चालणार आहे. या पार्श्‍वभूमीवर चीनने हैनान प्रांतातील सान्या येथील नौदल तळापासून व्हिएतनामच्या हुए शहरापर्यंतचे सागरी तसेच हवाई क्षेत्र कुठल्याही प्रकारच्या प्रवासासाठी बंद असेल, असे चीनच्या स्थानिक प्रशासनाने सांगितले.

यापैकी हुए शहरापर्यंत लांबलेला हा सराव व्हिएतनामच्या सागरी व हवाई सीमेचे उल्लंघन करणारा असल्याचा आरोप व्हिएतनामने केला. आमच्या देशाच्या २०० नॉटिकल मैल ‘एक्सक्लुझिव्ह इकोनॉमिक झोन-ईईझेड’च्या पट्ट्यात चीन हा सराव आयोजित करीत असल्याचा आरोप व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या ‘ले थी थू हँग’ यांनी केला. त्यामुळे चीनचा हा सराव संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमांची पायमल्ली असल्याची टीका थू हँग यांनी केली.

त्याचबरोबर व्हिएतनामबरोबरचे संबंध बिघडणार नाहीत, तसेच क्षेत्रीय शांती व स्थैर्याला हादरे बसणार नाही, अशी पावले चीनने उचलू नये, असा इशारा व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिला. आमच्या क्षेत्रातील चीनच्या प्रत्येक हालचालींवर व्हिएतनामची बारीक नजर असल्याचे थू हँग म्हणाले.

सामर्थ्यप्रदर्शनचीनचा हा युद्धसराव आणि गेल्या काही दिवसांमध्ये चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने केलेल्या घोषणांवर या क्षेत्रातील विश्‍लेषकांनी आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले आहे. गेल्या आठवड्यात चीनने २३० अब्ज डॉलर्सचा संरक्षणखर्च जाहीर केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत चीनने यावर्षी आपल्या संरक्षणखर्चात सात टक्क्यांची वाढ केली होती. चीनने या संरक्षणखर्चात नौदलावरील खर्चाला मोठे महत्त्व दिले होते. जपानबरोबरचा सेंकाकू बेटांचा वाद, तैवान तसेच साऊथ चायना सीच्या क्षेत्रातील वाढता तणाव, या पार्श्‍वभूमीवर चीनच्या या सरावाचे महत्त्व वाढल्याचे स्थानिक विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. या संरक्षणखर्चाच्या घोषणेला काही तास उलटत नाही तोच, साऊथ चायना सीच्या प्रश्‍नावर क्षेत्रीय देश वगळता इतरांचा हस्तक्षेप मान्य करणार नाही, असा इशारा चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिला.

येत्या काही दिवसात बायडेन प्रशासनाने वॉशिंग्टन येथे आयोजित केलेली असियान देशांची विशेष बैठक पार पडणार आहे. या निमित्ताने चीनने असियान देशांना धमकावत असल्याचे विश्‍लेषक लक्षात आणून देत आहेत. व्हिएतनामच्या सागरी क्षेत्रात सरावाचे आयोजन करण्यामागेही चीनचा हाच हेतू असल्याचे विश्‍लेषक सांगत आहेत.

सध्या सार्‍या जगाचे लक्ष रशिया-युक्रेन संघर्षाकडे लागले आहे. याचा फायदा घेऊन चीनने साऊथ चायना सीच्या क्षेत्रातील आपल्या हालचाली आक्रमक केल्याचा दावा हे विश्‍लेषक करीत आहेत. दरम्यान, युक्रेनमधील संघर्षाचा फायदा घेऊन चीन तैवानवर हल्ला चढविल, असा इशारा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता.

leave a reply