फ्लोरिडा – ‘स्पेसएक्सच्या यानाने नासाच्या दोन अंतराळवीरांना घेऊन अवकाशात घेतलेली झेप ही अंतराळ क्षेत्रातील नव्या युगाची पहाट आहे. आजच्या प्रक्षेपणाने अंतराळक्षेत्रात खाजगी उद्योग हेच भविष्य असेल यावर शिक्कामोर्तब केले आहे’, अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याचे स्वागत केले. शनिवारी नासा व स्पेसएक्स यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडलेल्या ‘डेमो-२’या अंतराळ मोहिमेची राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. शनिवारी दुपारी फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून ‘क्रू ड्रॅगन’ या अवकाशयानाने घेतलेली झेप, अंतराळक्षेत्राच्या इतिहासात खाजगी कंपनीने तयार केलेल्या रॉकेट व यानाच्या सहाय्याने अंतराळवीरांना पाठविण्याची पहिलीच घटना आहे.
शनिवारी दुपारी 3 वाजून 22 मिनिटांनी बॉब बेहन्केन व डग हर्ले या नासाच्या दोन अंतराळवीरांनी ‘क्रू ड्रॅगन’ हे अवकाशयान व ‘फाल्कन ९’ रॉकेटसह ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’च्या विशेष मोहिमेसाठी झेप घेतली. या प्रक्षेपणासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांची विशेष उपस्थिती होती. २०११ सालानंतर अमेरिकी अंतराळवीरांना अमेरिकेच्या भूमीवरून अंतराळात पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
नऊ वर्षांपूर्वी अमेरिकन अंतराळयाने वापरण्याचे थांबवल्यानंतर नासाने अमेरिकेच्या अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यासाठी रशियाचे सहकार्य घेतले होते. मात्र त्यासाठी मोठा खर्च येत असल्याने नासाने खाजगी कंपन्यांची चाचपणी सुरू केली होती. २००२ साली एलोन मस्क यांनी स्थापन केलेल्या स्पेसएक्स या कंपनीने नासाने घातलेले कठोर निकष पूर्ण करून अंतराळमोहिमेचे कंत्राट मिळवण्यात यश मिळविले होते.
‘स्पेसएक्स’ व नासामध्ये २.६ अब्ज डॉलर्सचा करार झाला असून याअंतर्गत स्पेसएक्स कंपनीकडे सहा मोहिमांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्पेसएक्सव्यतिरिक्त नासाने बोइंग या आघाडीच्या कंपनीबरोबर ही चार अब्ज डॉलर्सचा करार केला आहे. अमेरिकेने २०२४ साली पुन्हा चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याची मोहीम आखली असून २०३० सालापर्यंत मंगळावर अंतराळवीरांना पाठवण्याची महत्वाकांशी घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी स्पेसएक्सने घेतलेली झेप महत्त्वाची ठरते.