कोलंबो – भयंकर आर्थिक संकटात सापडलेल्या आपल्या देशाला भारताने केलेल्या सहाय्याबद्दल श्रीलंकेचे नवे पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांनी आभार मानले आहेत. तसेच आपल्याला भारताशी अधिक दृढ संबंध प्रस्थापित करायचे आहेत, असे पंतप्रधान विक्रमसिंघे पुढे म्हणाले. तर चीनने विक्रमसिंघे यांच्या नियुक्तीवर सावध प्रतिक्रिया नोंदविली आहे. आधीच्या काळात पंतप्रधानपदावर असताना विक्रमसिंघे यांनी चीनने श्रीलंकेत केलेल्या गुंतवणुकीची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे विक्रमसिंघे पुन्हा एकदा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदावर आल्याने चीन त्यांच्याकडे सावधपणे पाहत असल्याचे दिसते.
श्रीलंकन जनतेला अन्न, वीज आणि इंधन पुरविण्याला आपली प्राथमिकता असेल. अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही विक्रमसिंघे यांनी जनतेला दिली. मात्र यापुढे निदर्शने कायम ठेवणे देशाच्या हिताचे ठरणार नाही. निदर्शकांशी यासंदर्भात मी स्वतःहून चर्चा करणार आहे, अशी माहिती पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी दिली. अन्नधान्य, इंधन व वीजेचा पुरवठा करीत असताना, निदर्शने थांबवून देशात स्थैर्य प्रस्थापित करण्याचे काम आपण करू शकतो, असा विश्वास विक्रमसिंघे यांनी व्यक्त केला आहे. मात्र 225 इतकी सदस्यसंख्या असलेल्या श्रीलंकेच्या संसदेत बहुमत प्रस्थापित करणे, हे विक्रमसिंघे यांच्यासमोरील पहिले मोठे आव्हान मानले जाते.
सध्या संसदेत विक्रमसिंघे यांच्या पक्षाचा केवळ एकच सदस्य आहे. अशा परिस्थितीत इतर पक्षांचा पाठिंबा मिळवून विक्रमसिंघे यांना बहुमत मिळविता येईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही राजकीय पक्षांनी तर विक्रमसिंघे यांना पंतप्रधानपदावर आणून श्रीलंकेच्या जनमताचा अपमान करण्यात आल्याचा ठपका ठेवला आहे. मात्र वेळ येईल त्यावेळी आपण बहुमत सिद्ध करू, असा विश्वास पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी व्यक्त केला. त्याचवेळी श्रीलंकेला सुमारे तीनशे कोटीहून डॉलर्सहून अधिक प्रमाणात अर्थसहाय्य पुरविणाऱ्या भारताचे विक्रमसिंघे यांनी आभार मानले आहेत. या सहाय्यासाठी भारताच्या पंतप्रधानांचे आम्ही आभारी आहोत, असे सांगून पुढच्या काळात आपण श्रीलंकेचे भारताबरोबरील संबंध अधिक दृढ व्हावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा विक्रमसिंघे यांनी केली.
दरम्यान, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी आपला देश श्रीलंकेच्या नव्या सरकारला सहाय्य करील, असे जाहीर केले आहे. तरीही चीन पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्याकडे अतिशय सावधपणे पाहत असल्याचे दिसत आहे. याआधीच्या काळात पंतप्रधानपदावर असताना विक्रमसिंघे यांनी चीनच्या गुंतवणुकीची चौकशी करण्याचे कठोर निर्णय घेतले होते. माजी पंतप्रधान राजपक्षे यांनी गैरव्यवहार व भ्रष्टाचार करून चीनला श्रीलंकेत गुंतवणुकीसाठी मोकळे रान दिले. शिवाय चीनकडून चढ्या व्याजदराने कर्ज घेऊन राजपक्षे यांनी श्रीलंकेला चिनी कर्जाच्या सापळ्यात अडकविल्याचे आरोप झाले होते. त्याची चौकशी करण्याचा विक्रमसिंघे यांनी घेतलेला निर्णय चीनला अस्वस्थ करणारा ठरला होता. त्याचा प्रभाव राजपक्षे नव्याने पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेत असताना देखील पहायला मिळत आहे.