वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकन लष्कराला दंगेखोरांवर गोळ्या झाडण्याचे आदेश

कोलंबो – गेल्या दोन दिवसांपासून श्रीलंकेत भडकलेल्या हिंसाचारात आठ जणांचा बळी गेला असून अडीचशेहून अधिक जण जखमी झाले आहेत. सरकार व राजपक्षे कुटुंबाविरोधात श्रीलंकन जनतेत असलेला संताप दिवसेंदिवस भडकत आहे. त्याचा फटका सार्वजनिक मालमत्ता, खाजगी उद्योग तसेच राजकीय नेत्यांनाही बसू लागला आहे. हिंसाचाराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी श्रीलंका सरकारने संरक्षणदलांना ‘इमर्जन्सी पॉवर्स’ बहाल केल्या असून दंगलखोरांना गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.

गोळ्या झाडण्याचे आदेशदेशावर ओढवलेल्या अभूतपूर्व आर्थिक संकटामुळे जनतेतील असंतोषाने उग्ररुप धारण केल्याने सोमवारी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिला होता. मात्र या राजीनाम्यानंतरही जनतेतील नाराजी व संताप कमी झालेला नसून रस्त्यावर उतरलेले निदर्शक अधिकच आक्रम झाले आहेत. मंगळवारी संतप्त जमावाने पंतप्रधान राजपक्षे यांचे ‘टेम्पल ट्रिज’ हे निवासस्थान पेटवून दिले. या घटनेपूर्वी पंतप्रधान राजपक्षे व त्यांच्या कुुटुंबियांनी त्रिंकोमाली बंदरावर असलेल्या श्रीलंकन नौदलाच्या तळावर स्थलांतर केल्याचे सांगण्यात येते.

ही माहिती मिळाल्यावर त्रिंकोमाली तळाच्या बाहेरही निदर्शने सुरू झाली आहेत. निदर्शकांनी राजपक्षे यांना अटक करून तुरुंगात धाडण्यात यावे, अशी आक्रमक मागणी केली आहे. त्याचवेळी राजपक्षे यांचे समर्थक असलेले संसद सदस्य व मंत्र्यांच्या निवासस्थानांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासात सत्ताधारी पक्षाच्या 10हून अधिक नेत्यांच्या घरांची तसेच इतर मालमत्तांची जाळपोळ करण्यात आली आहे. सरकारविरोधी निदर्शक व राजपक्षे समर्थकांमध्ये अनेक ठिकाणी चकमकीही उडाल्या आहेत. या चकमकींमध्ये आठ जणांचा बळी गेला आहे तर 250हून अधिक जण जखमी झाले आहेत.

पंतप्रधान राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतरही हिंसाचार आटोक्यात येत नसल्याने श्रीलंका सरकारने आता संरक्षणदलांना ‘इमर्जन्सी पॉवर्स’ बहाल केल्या आहेत. त्यानुसार, संरक्षणदलांच्या जवानांना हिंसा व जाळपोळ करणाऱ्या दंगेखोरांना गोळी घालण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्याचवेळी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी जनतेला हिंसाचार थांबवून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. येत्या काही दिवसात श्रीलंकेच्या संसदेचे विशेष सत्र आयोजित करण्यात येईल, असे संकेतही सूत्रांनी दिले आहेत. देशाच्या ॲटर्नी जनरलनी देशात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांची चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत.

श्रीलंकेला भारताकडून 3.5 अब्ज डॉलर्सचे सहाय्य 

गोळ्या झाडण्याचे आदेशश्रीलंकेची लोकशाही, स्थैर्य आणि अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी भारत सर्वतोपरी सहकार्य करील, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे. नेबरहूड फर्स्ट अर्थात शेजारी देशांना सर्वोच्च प्राधान्य या भारताच्या धोरणानुसार श्रीलंकेसाठी भारताने यावर्षी देण्यात येणारे अर्थसहाय्य सुमारे 3.5 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढविले आहे, अशी घोषणा बागची यांनी केली.

याच्या व्यतिरिक्त भारतीय जनता आपल्या स्तरावर श्रीलंकन जनतेला अन्नधान्य व औषधांचे करीत आहे, असे अरिंदम बागची पुढे म्हणाले.

 

leave a reply