लाहोर – पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात काम करणार्या प्रियांथा कुमारा या श्रीलंकन अधिकार्याची पाकिस्तानातील कट्टरपंथियांनी दिवसाढवळ्या निघृणरित्या हत्या केली. ईशनिंदेचा आरोप करून या जमावाने प्रियांथाला जिवंत पेटवून दिले. यामागे ‘तेहरिक-ए-लबैक’ या संघटनेचे समर्थक असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्याच महिन्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने पंजाब पोलिसांच्या हत्येचा आरोप असलेल्या लबैकच्या शेकडो समर्थकांची तुरुंगातून सुटका केली होती. यामध्ये लबैकच्या प्रमुखाचा देखील समावेश होता. इम्रान खान यांच्या या निर्णयावर पाकिस्तानातून जोरदार टीका झाली होती.
पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार कट्टरपंथियांचे समर्थक असल्याचे आरोप होत आहेत. गेल्या तीन वर्षांच्या कारकिर्दीत पंतप्रधान इम्रान व त्यांच्या सरकारमधील इतर मंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी व कट्टरपंथियांचे जोरदार समर्थन केले आहे. पाकिस्तानच्या संसदेमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांनी अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनला शहीद घोषित केले होते. यानंतर पाकिस्तानातील माध्यमांपासून जगभरात पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीका झाली होती.
तर तेहरिक-ए-लबैक ही आपली सहकारी संघटना असल्याची घोषणा पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी केली होती. गेल्या वर्षभरात इम्रान खान यांच्या सरकारने लबैकच्या हजाराहून अधिक समर्थकांची सुटका केली. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील पोलिसांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या या संघटनेबाबत इम्रान खान यांनी दाखविलेल्या या भूमिकेवर पाकिस्तानातील सर्वच स्तरातून टीका झाली होती.