वॉशिंग्टन – अमेरिकेच्या शेअरबाजारांमध्ये झालेल्या घसरणीमुळे देशातील गुंतवणूकदारांचे तब्बल पाच ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान झाले आहे. वर्षअखेरपर्यंत गुंतवणूकदारांना बसलेल्या आर्थिक फटक्याची व्याप्ती नऊ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत जाऊ शकते, असा इशारा अमेरिकेतील आघाडीची वित्तसंस्था ‘जेपी मॉर्गन चेस’ने दिला. गेल्या चार महिन्यात अमेरिकेतील ‘डो ॲण्ड जोन्स’, ‘एस ॲण्ड पी 500′, ‘नॅस्डॅक 100′ व ‘ब्लूमबर्ग इंडेक्स’ हे आघाडीचे निर्देशांक 16 ते 48 टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. वाढती महागाई व मंदीच्या भीतीमुळे त्यात अजून घसरण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेले काही आठवडे अमेरिकी शेअरबाजारांमध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. गेल्या आठवड्याच्या अखेरीसही अमेरिकेतील प्रमुख शेअर निर्देशांक दोन ते तीन टक्क्यांनी खाली आले होते. या घसरणीमुळे अमेरिकेतील अब्जाधीश उद्योजकांपासून ते सर्वसामान्य गुंतवणूकदारांपर्यंत प्रत्येकाला फटका बसल्याचे दिसत आहे. जगातील आघाडीचे अब्जाधीश असणाऱ्या एलॉन मस्क व जेफ बेझॉस यांच्या संपत्तीत तब्बल 40 टक्क्यांची घट झाली आहे. मस्क यांच्या ‘टेस्ला’ कंपनीचे शेअर 45 टक्क्यांनी खाली आले आहेत. तर जेफ बेझॉस यांच्या ‘ॲमेझॉन’ कंपनीचे शेअर्स 37 टक्क्यांनी घसरले आहेत.
अमेरिकेतील आघाडीचा ‘डो ॲण्ड जोन्स’ निर्देशांक 16 टक्क्यांनी खाली आला आहे. तर ‘एस ॲण्ड पी 500’मध्ये जवळपास 20 टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली आहे. ‘नॅस्डॅक 100′ 27 टक्क्यांनी तर ‘ब्लूमबर्ग इंडेक्स ऑफ क्रिप्टोकरन्सीज्’ तब्बल 48 टक्क्यांनी कोसळला आहे. शेअर निर्देशांकातील दीर्घकालिन घसरण ‘बिअर मार्केट’ या नावाने ओळखण्यात येते. ही स्थिती मंदीच्या पूर्वी निर्माण होत असल्याचे यापूर्वीच्या घटनांवरून दिसून आले आहे.
अमेरिकेतील महागाई साडेआठ टक्क्यांवर गेली असून या वर्षाच्या पहिल्या तिमाहित आर्थिक विकासदरालाही फटका बसला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात अमेरिकेला मंदीचा फटका बसू शकतो, असे भाकित अर्थतज्ज्ञ तसेच विश्लेषकांकडून वर्तविण्यात येत आहे. शेअरबाजारातील विक्रमी घसरण व गुंतवणूकदारांचे झालेले नुकसान हे घटकही त्याला दुजोरा देणारे ठरतात.