वॉशिंग्टन – ‘जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) चीनच्या बाजूने पक्षपाती आहे. हे सर्वथा अनुचित ठरते. म्हणूनच यापुढे अमेरिका ‘डब्ल्यूएचओ’चा निधी रोखणार आहे’, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. कोरोनाव्हायरसच्या साथीबाबत ‘डब्ल्यूएचओ’ने अत्यंत ढिसाळ भूमिका स्वीकारुन चीनचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. ‘डब्ल्यूएचओ’चे अध्यक्ष टेड्रॉस घेब्रेस्यूएस हे चीनचे हस्तक असून त्यांच्यामुळेच जगावर हे साथीचे संकट कोसळे आहे, अशी टीका अमेरिका, ब्रिटन व जपानमधून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘डब्ल्यूएचओ’ला मिळणार्या एकूण निधीपैकी सुमारे १५ टक्के एवढा निधी पुरविणार्या अमेरिकेने घेतलेला हा निर्णय या संघटनेची कोंडी करू शकतो. अमेरिकेच्या या निर्णयाचे फार मोठे राजकीय पडसाद संभवतात.
कोरोनाव्हायरसच्या विरोधात अमेरिकेने सर्वात मोठी मोहीम छेडली असून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प दररोज माध्यमांद्वारे अमेरिकी जनतेला संबोधित करीत आहेत. मंगळवारी माध्यमांसमोर बोलताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘डब्ल्यूएचओ’ला लक्ष्य केले. “‘डब्ल्यूएचओ’ला मिळणारे अर्थसहाय्य अमेरिका रोखत आहे. या अर्थसहाय्यावर आम्ही अतिशय प्रभावशाली रोख लावणार आहोत. ही संघटना व्यवस्थित काम करीत असती, तर काही प्रश्नच नव्हता. पण जेव्हा ही संघटना आमच्या प्रत्येक गोष्टींला विरोध करते तेव्हा ते अजिबात योग्य ठरत नाही व ते खपवूनही घेतले जाणार नाही”, असे संकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिले.
त्याचबरोबर ‘डब्ल्यूएचओ’ला मिळणार्या आर्थिक सहाय्यापैकी सर्वाधिक सहाय्य अमेरिकेकडून पुरविले जाते, याची आठवण राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी करुन दिली. तरही ‘डब्ल्यूएचओ’ चीनच्या बाजूने पक्षपात करीत असल्याचा ठपका राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ठेवला. ‘महिन्याभरापूर्वी अमेरिकेने कोरोनाव्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी चीनमधून दाखल होणार्या प्रवाशांवर बंदी जाहीर केली होती. त्यावेळी या संघटनेने अमेरिकेच्या या निर्णयावर आक्षेप घेतला होता. डब्ल्यूएचओची ही चीनधार्जिणी भूमिका अतिशय चुकीची होती’, असे सांगून ट्रम्प यांनी या संघटनेच्या हेतूवरच प्रश्न उपस्थित केले.
फक्त अमेरिकेबाबतची भूमिका नाही तर या संघटनेने कोरोनाव्हायरसबाच्या साथीबत घेतलेले निर्णय देखील पूर्णपणे चुकीचे ठरले, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले. चीनला वाचविण्यासाठी ‘डब्ल्यूएचओ’ने या साथीची माहिती बराच काळ दडवून ठेवली, असा अत्यंत गंभीर आरोप अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केला आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘डब्ल्यूएचओ’बाबत घेतलेल्या या आक्रमक निर्णयामूळे या संघटनेवरील दडपण प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. अमेरिकेच्या आधी ब्रिटन व जपान या देशांनीदेखील ‘डब्ल्यूएचओ’वर सडकून टीका केली होती व ही संघटना धडधडीत चीनच्या बाजूने पक्षपात करीत असल्याचा आरोप केला होता. तर अमेरिकेच्या सिनेटर मार्था मॅकसॅली यांनी ‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख टेड्रॉस घेब्रेस्यूएस यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ‘डब्ल्यूएचओ’चे अर्थसहाय्य रोखल्यानंतर इतर देशांकडूनही असेच निर्णय घेतले जाऊ शकतात. त्यामुळे ‘डब्ल्यूएचओ’ बरोबरच चीनलाही फार मोठा धक्का बसणार आहे. कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे राजनैतिक पातळीवरील घनघोर संघर्षाचा आरंभ यामुळे झाला आहे, असे स्पष्टपणे दिसू लागले आहे.