रशियाच्या इंधनक्षेत्रावरील निर्बंधांबाबत युरोपिय महासंघात तीव्र मतभेद

तीव्र मतभेदब्रुसेल्स/मॉस्को – रशियावर एकापाठोपाठ एक निर्बंधांचा मारा करणार्‍या युरोपिय देशांमध्ये इंधनाच्या मुद्यावरून तीव्र मतभेद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. जर्मनी, नेदरलॅण्डस् व हंगेरी या देशांनी रशियाच्या इंधनआयातीवर निर्बंध लादण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. युरोपिय महासंघातील काही देश एका दिवसात रशियाची इंधनआयात थांबवू शकत नाहीत, अशा शब्दात जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री ऍनालेना बेअरबॉक यांनी जर्मनीची भूमिका स्पष्ट केली. तर हंगेरीच्या इंधनसुरक्षेला धोका निर्माण होईल, अशा कोणत्याही निर्बंधांना आम्ही मान्यता देणार नसल्याचे हंगेरीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिका व ब्रिटनने रशियाच्या इंधनआयातीवर बंदी टाकल्याचे जाहीर केले होते. रशियन अर्थव्यवस्थेचा कणा मोडण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे समर्थन या देशांनी केले होते. तीव्र मतभेदरशियाच्या इतर क्षेत्रातील निर्बंधांच्या बाबतीत अमेरिकेला समर्थन देणार्‍या युरोपिय महासंघाने या मुद्यावर मात्र पाठिंबा दिला नव्हता. युरोपिय देश रशियाच्या इंधनआयातीवर अवलंबून असून त्याला पर्याय मिळालेला नसल्याचे स्पष्ट मत जर्मनीने मांडले होते.

युरोपिय देशांमध्ये आयात होणार्‍या इंधनापैकी ३० टक्क्यांहून अधिक इंधन रशियातून येते. यात नैसर्गिक इंधनवायू तसेच कच्च्या तेलाचाही समावेश आहे. रशियाला पर्याय देण्यासाठी अमेरिकेने युरोपला इंधनाचा पुरवठा करण्याबाबत कतार, युएई, अल्जेरिया आणि अझरबैजान या देशांशी संपर्क साधला होता. पण युरोपिय देशांना इंधनाच्या पुरवठ्यासाठी रशिया सोडून दुसरा कुठलाही व्यवहार्य पर्याय असू शकत नाही, हे या देशांनी अमेरिकेला स्पष्टपणे सांगितल्याचा दावा माध्यमांनी केला आहे. तसेच कोळसा व अणुऊर्जा हे ऊर्जेचे अन्य स्त्रोत आहेत. पण पर्यावरण आणि सुरक्षेच्या मुद्यावर त्यांना युरोपिय देशांमधून विरोध होत आहे.

तीव्र मतभेदमात्र युद्धाच्या वाढत्या तीव्रतेच्या पार्श्‍वभूमीवर काही देशांनी पुन्हा एकदा रशियाच्या इंधनक्षेत्रावरील निर्बंध तसेच बंदीचा मुद्दा पुढे रेटण्यास सुरुवात केली आहे. यात पोलंडसह बाल्टिक देश आघाडीवर आहेत. त्याला जर्मनी, नेदरलॅण्ड्स व हंगेरीसारख्या देशांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. इंधनाचा पुरवठा हा तात्विक किंवा विचारसरणीशी निगडीत मुद्दा नाही, त्याचा संबंध रोख व्यवहाराशी आहे, अशा शब्दात हंगेरीचे परराष्ट्रमंत्री पीटर झिजार्तो यांनी सुनावले आहे. युरोपिय महासंघाचे परराष्ट्र प्रमुख जोसेप बोरेल यांनी या मुद्यावर मतभेद असल्याची कबुलीही दिली असून नजिकच्या काळात त्यावर निर्णय होणे कठीण असल्याचे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी रशियानेही युरोपिय देशांना इंधनआयातीवरील बंदीवरून सज्जड इशारा दिला होता. अशा बंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक व जबर फटका युरोपिय देशांनाच सहन करावा लागणार असून अमेरिकेवर त्याचा फरक पडणार नाही, असे रशियन अधिकार्‍यांनी बजावले होते.

leave a reply