नवी दिल्ली – ‘लष्करी सेवेत भरती होण्यासाठी शारीरीक व मानसिक कणखरतेच्या बरोबरीने देशासाठी समर्पण करण्याची वृत्ती सर्वाधिक महत्त्वाची ठरते. ही वृत्ती ज्यांच्याकडे नाही, ते लष्करात सेवा करू शकत नाही’, अशा परखड शब्दात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी अग्नीपथ योजनेवर घेतल्या जात असलेल्या आक्षेपांना तोंड दिले. चार वर्षाच्या सेवेनंतर पुढ आपल्या करिअरचे काय होईल, ही शंका घेणाऱ्यांसाठी डोवल यांनी हा सल्ला दिला आहे. त्याचवेळी देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सच्या दिशेने झेप घेत असताना, अग्नीवीरांसाठी करिअरच्या अफाट संधी उपलब्ध होतील, असा विश्वास राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी व्यक्त केला आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी अग्नीपथ योजनेवरील आपली भूमिका परखडपणे मांडली. ही योजना मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगून डोवल यांनी या योजनेचे जोरदार समर्थन केले. भारत हा जगातील सर्वाधिक तरूण देश आहे. अशा देशातील लष्कराचे सरासरी वय अधिक असू शकत नाही, असे डोवल यांनी म्हटले आहे. सध्या लष्करी जवानांचे 32 इतके सरासरी वय 26 वर आणणे हे अग्नीपथ योजनेचे मूळ उद्दिष्ट असल्याचे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी ही बाब नव्याने लक्षात आणून दिली.
याबरोबरच अग्नीपथ योजनेमुळे ‘टेक-सॅव्ही’ अर्थात अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी अधिक चांगल्यारितीने स्वतःला जोडून घेणारे युवक संरक्षणदलांना मिळतील. त्यांच्यामुळे संरक्षणदल टेक-सॅव्ही बनेल, असा विश्वास अजित डोवल यांनी व्यक्त केला. आत्ताच्या काळात युद्धतंत्र बदलत चालले असून नॉन कॉन्टॅक्ट वॉरफेअर अर्थात थेट संपर्क न येता केल्या जाणाऱ्या युद्धाचा सामना करावा लागत आहे. याबरोबरच अदृश्य अर्थात नजरेस न पडणाऱ्या शत्रूशी आपल्याला मुकाबला करावा लागत आहे. याचे कारण तंत्रज्ञान जबरदस्त वेगाने प्रगती करीत आहे, याची जाणीव डोवल यांनी करून दिली.
‘जर आपल्याला पुढच्या काळातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज रहायचे असेल, तर आत्तापासूनच त्याची सुरूवात करायला हवी. अग्नीपथ योजना या सज्जतेचा भाग ठरतो’, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना ठासून सांगितले. ‘अग्नीपथ योजना देशाला अधिक सुरक्षित व लष्कराला अधिक बलशाली बनविणारी आहे’, अशी ग्वाही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी दिली. दरम्यान, जम्मू व काश्मीरबाबत बोलताना 2019 नंतर काश्मिरी जनतेचा मानसिकता पूर्णपणे बदलल्याची नोंद डोवल यांनीकेली. इथली जनता आता पाकिस्तान व दहशतवादाच्या बाजूने नाही तर विरोधात गेलेली आहे, असा दावा डोवल यांनी केला.
भारताला इतर सर्व शेजारी देशांसह पाकिस्तानशी चांगले संबंध हवे आहेत. पण त्यासाठी दहशतवाद सहन करण्याची भारताची तयारी नाही. भारत कुठल्याही परिस्थितीत शांततेसाठी कुणाकडेही याचना करणार नाही. आपल्या शत्रूला हवे त्यावेळी शांती आणि युद्ध यापैकी कुणाचीही निवड करण्याची संधी देता येणार नाही. आपल्याला आपल्या हितसंबंधांचे संरक्षण करायचे असेल तर आपल्या शर्तीवर आपल्याला हवे तेव्हा, कधी आणि कुणाशी शांतता प्रस्थापित करायची ते आपल्याला ठरवावे लागेल, असे सूचक उद्गार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी काढले आहेत.
भारत व चीनच्या सीमावादाबाबत बोलताना देखील डोवल यांनी चीनला भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे बजावले आहे.