फ्लोरिडा – अमेरिकेची अंतराळसंस्था नासाने ‘आर्टेेमिस’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत ‘ओरियन’ या अंतराळयानाचे यशस्वी प्रक्षेपण केले. बुधवारी दुपारी फ्लोरिडा प्रांतातील केनेडी स्पेस सेंटरवरून ‘स्पेशल लाँच सिस्टिम’ या रॉकेटच्या सहाय्याने हे प्रक्षेपण करण्यात आल्याचे नासाने जाहीर केले. १९७२ साली पाठविण्यात आलेल्या ‘अपोलो’ मोहिमेनंतर नासा प्रथमच चंद्रावर अंतराळयान पाठवित असल्याने हे प्रक्षेपण लक्ष वेधून घेणारे ठरते.
गेल्या दशकात नासाने चंद्रावर पुन्हा एकदा अंतराळमोहीम राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. या अंतराळमोहिमेत चंद्रावर अंतराळवीर धाडण्याबरोबरच चंद्रावरील खनिजसंपत्तीचे उत्खनन व कायमस्वरुपी तळ उभारणे यासारख्या महत्त्वाकांक्षी योजनांचाही समावेश आहे. त्यासाठी नासाने नवे प्रक्षेपक रॉकेट विकसित करण्यावर अधिक भर दिला होता. बुधवारी प्रक्षेपित करण्यात आलेल्या ‘स्पेशल लाँच सिस्टिम’ या रॉकेटसाठी तब्बल चार अब्ज डॉलर्स खर्च करण्यात आले आहेत.
बुधवारी धाडण्यात आलेली मोहीम एकूण सहा आठवड्यांची असून त्यातील चार आठवडे ‘ओरियन’ हे चांद्रयान चंद्राभोवती भ्रमण करणार आहे. या यानात मानवाकृती पुतळे ठेवण्यात आले असून भ्रमणकाळात यानातील विविध यंत्रणांची चाचणी घेण्यात येणार आहे. ‘अपोलो’ मोहिमेनंतर तब्बल ५० वर्षांनी नासा चंद्रावर यान पाठवित असल्याने ही मोहीम अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ‘आर्टेमिस’च्या पहिल्या टप्प्यासाठी युरोपियन अंतराळसंस्थेचेही सहाय्य घेण्यात आले आहे.
ओरियन सुरक्षितरित्या माघारी आल्यास २०२४ साली मानवी अंतराळवीरांसह चंद्राभोवती भ्रमण करण्याची योजना आहे. त्यानंतर २०२५ साली दोन अंतराळवीर पुन्हा चंद्रावर पाऊल ठेवतील, अशी माहिती नासाकडून देण्यात आली आहे. गेल्या काही दशकात चीन व रशियासह अंतराळक्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या मोहिमांची व्याप्ती वाढली असून भारत, जपान, युएई व युरोपिय देशांचा अंतराळातील वावरही वाढला आहे. चीन व रशियाच्या वाढत्या कारवाया अमेरिकेसाठी नवे आव्हान ठरले आहे. या पार्श्वभूमीवर अंतराळक्षेत्रातील प्रभाव कायम राखण्यासाठी ‘आर्टेमिस’चे यश अमेरिकेला सहाय्यक ठरेल, असे सांगण्यात येते.