नवी दिल्ली – मंगळवारी ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या नौदल आवृत्तीची चाचणी पार पडली. ‘आयएनएस विशाखापट्टणम` या विनाशिकेवरून प्रक्षेपित करण्यात आलेल्या या सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राने निर्धारित लक्ष्याचा अचूकतेने वेध घेतला व सारे निकष पूर्ण केले. महिनाभरापूर्वी ब्रह्मोसची हवाई चाचणी करण्यात आली होती. देशाकडे कुणी वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही, इतक्या प्रमाणात ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची निर्मिती केली जाईल, अशी घोषणा संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी गेल्याच महिन्यात केली होती.
आयएनएस विशाखापट्टणमवरून प्रक्षेपित करण्यात आलेल्या ब्रह्मोसच्या नौदल आवृत्तीने निर्धारित लक्ष्य अचूकतेने भेदले. ध्वनीच्या तीन पट वेगाने प्रवास करणारे हे क्षेपणास्त्र पुढच्या काळात भारतीय नौदलाच्या मारकक्षमतेत प्रचंड प्रमाणात वाढ करणारे ठरेल. चीन आपल्या नौदलाचे सामर्थ्य प्रचंड प्रमाणात वाढवित आहे. चीन आपल्या नौदलच्या ताफ्यातील पाणबुड्या, युद्धनौका, विनाशिकांमध्ये मोठी भर घालत आहे. त्याचवेळी चीनच्या नौदलाचा हिंदी महासागर क्षेत्रातील वावर ही भारताच्या सुरक्षेला आव्हान देणारी बाब असल्याचे मानले जाते. अशा परिस्थितीत, भारतीय नौदलाने ‘सी टू सी` मारा करणाऱ्या ब्रह्मोसची चाचणी करून आपली क्षमता दाखवून दिली आहे. ब्रह्मोस हे जगातील अत्याधुनिक सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र असून अतिप्रगत रडारयंत्रणेलाही गुंगारा देण्याची क्षमता ब्रह्मोसकडे आहे. भारत व रशियाने संयुक्तपणे विकसित केलेल्या या क्षेपणास्त्राची धास्ती चीनलाही वाटत असल्याचे याआधी समोर आले होते.
गेल्याच महिन्यात उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथे ब्रह्मोसची निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पायाभरणी समारोह पार पडला होता. यावेळी बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची प्रचंड प्रमाणात निर्मिती केली जाईल, असे जाहीर केले होते. कुणाचीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही, इतक्या प्रमाणात देश ब्रह्मोसची निर्मिती करील. पण या क्षमतेचा वापर दुसऱ्या देशांवर आक्रमणासाठी नाही, तर स्वसंरक्षणासाठी केला जाईल, असे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले होते.