नवी दिल्ली – रशियन बनावटीची तलवार श्रेणीतील युद्धनौका ‘आयएनएस तुशिल’चे रशियाच्या कालिनिनग्राड येथे शुक्रवारी जलावतरण झाले. ही युद्धनौका भारतीय नौदल ताफ्यात सामील झाल्यावर तलवार श्रेणीतील भारतीय नौदलाच्या ताफ्यातील ही सातवी युद्धनौका ठरेल. सध्या या श्रेणीतील सहा युद्धनौका नौदलात कार्यरत आहेत. लवकरच चाचण्या पूर्ण करून ‘आयएनएस तुशिल’ही भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल.
‘पी११३५.६’ श्रेणीतील अर्थात तलवार श्रेणीतील युद्धनौका या रशियन तटरक्षकदलामध्ये कार्यरत असलेल्या ‘क्रिवाक टू’ (पी११३५) श्रेणीतील युद्धनौकेचे अद्ययावत रुप आहे. १९९७ साली भारत आणि रशियामध्ये झालेल्या काराराअंतर्गत खास भारती नौदलासाठी ही अद्ययावत आवृत्ती रशियाने विकसित केली होती. २००० साली या श्रेणीतील पहिली युद्धनौका ‘आयएनएस तलवार’ रशियाने भारताकडे सुपूर्द केली होती. सध्या ‘आयएनएस तलवार’सह ‘आयएनएस त्रिशूल’, ‘आयएनएस तबर’, ‘आयएनएस तेग’, ‘आयएनएस तर्कश’ आणि ‘आयएनएस त्रिकंद’ या तलवार श्रेणीतील युद्धनौका भारतीय नौदलात कार्यरत आहेत. १९९७ च्या काराराअंतर्गत तयार करण्यात आलेल्या सहा युद्धनौकांपैकी तलवार श्रेणीतील शेवटची युद्धनौका ‘आयएनएस त्रिकंद’ ही २०११ साली भारताला सोपविण्यात आली, तर २०१३ साली ही युद्धनौका भारतीय नौदल ताफ्यात दाखल झाली.
यानंतर २०१६ साली भारताने तलवार श्रेणीतील आणखी चार युद्धनौकांसाठी रशियाबरोबर करार केला होता. १९९७ सालच्या कारारानुसार सर्व सहा युद्धनौकांची बांधणी ही रशियात झाली होती. तर २०१६ सालच्या कारारानुसार यातीन दोन युद्धनौका रशियात, तर दोन युद्धनौकांची बांधणी भारतात होणार आहे. यातील रशियाच्या कालिनिनग्राड येथील ‘यांतर शिपयार्ड’मध्ये उभारण्यात आलेली युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. शुक्रवारी या युद्धनौकेचे जलावतरण पार पडले. भारताच्या रशियातील राजदूत डी.बाला व्यंकटेश वर्मा यांच्या उपस्थितीत भारतीय राजनैतीक अधिकारी दतला विद्या वर्मा यांनी परंपरेनुसार विधीवत पुजन केल्यावर या युद्धनौकेचे तुशील असे औपचारीक नामकरण केले. त्यानंतर युद्धनौकेच जलावतरण पार पडले. यावेळी भारतीय नौदलाचे वरीष्ठ अधिकारी आणि रशियन सरकारचे वरीष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
तलवार श्रेणीतील इतर युद्धनौकांप्रमाणे ‘आयएनएस तुशिल’ स्टेल्थ युद्धनौका आहे. अर्थात शत्रूच्या रडारला चकमा देण्याची क्षमता या युद्धनौकेत असून ही युद्धानौका कमी आवाज करते. तसेच यावर युद्धनौकेवर जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे, सोनार यंत्रणा, टेहळणी रडार, अत्याधुनिक संपर्क यंत्रणा आणि पाणबुडीविरोधी यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. याबरोबर जमिनीवरून हवेत मारा करणारी रशियन क्षेपणास्त्र आणि माउंटेड गन बसविण्यात आली आहे.