तैवानवरचा हल्ला हा चीनसाठी ‘डेंजरस गेम’ ठरेल

- अमेरिकेच्या संरक्षणदलप्रमुखांचा इशारा

‘डेंजरस गेम’वॉशिंग्टन – ‘१९७९ साली व्हिएतनामबरोबर लढलेल्या संघर्षानंतर चीनच्या लष्कराने कुठलेही मोठे युद्ध लढलेले नाही. अशा परिस्थितीत चीनने तैवानवर हल्ला चढविला तर तो चीनसाठीच ‘डेंजरस गेम’ ठरेल. कारण अशा युद्धांचा चीनच्या लष्कराला अजिबात अनुभव नाही, त्यांचे प्रशिक्षणही झालेले नाही’, असा इशारा अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी दिला. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग एवढ्या लवकर तैवानवर हल्ल्याची घाई करणार नाही, असा दावाही जनरल मिले यांनी केला.

‘डेंजरस गेम’दोन दिवसांपूर्वी इंडोनेशियाच्या बाली येथे पार पडलेल्या जी२०च्या बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात चर्चा पार पडली. चीनबरोबरचे व्यापारी सहकार्य सुधारण्यावर बायडेन यांनी जिनपिंग यांच्याशी चर्चा केली. तसेच चीन तैवानवर हल्ला चढविणार नाही, असा दावा बायडेन यांनी केला होता. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर केलेल्या चर्चेवर अमेरिकेतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या भेटीद्वारे बायडेन यांनी चीनपासून असुरक्षित असलेल्या तैवानसह मित्रदेशांना चुकीचा संदेश दिल्याची टीका अमेरिकेतून झाली होती.

त्यानंतर व्हाईट हाऊस व पेंटॅगॉनकडून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या भेटीचे समर्थन केले जात आहे. अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी चीनबाबत दिलेला इशारा देखील त्याचाच एक भाग असल्याचे दिसते. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग तैवानवर इतक्यात हल्ला चढविणार नसल्याचे सांगून जनरल मिले तैवानला आश्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर रशियाने युक्रेनबाबत केलेल्या चुकीची पुनरावृत्ती चीन तैवानवर हल्ला चढवून करणार नाही, असा विश्वास अमेरिकेच्या संरक्षणदलप्रमुखांनी व्यक्त केला.

थोडक्यात रशियाने युक्रेनवर हल्ला चढविल्यानंतर अमेरिका व मित्रदेशांनी रशियावर निर्बंध लादले. तसेच रशियाविरोधी युद्धासाठी युक्रेनला शस्त्रसज्ज केले. त्याप्रमाणे चीनने तैवानवर हल्ला चढविला तर चीनवर देखील निर्बंधांची कारवाई केली जाईल, असे संकेत जनरल मिले देत असल्याचे दिसत आहे.

leave a reply