तैपेई – हुवेई प्रकरणामुळे पाश्चिमात्य देशांचा विश्वास गमावलेल्या चीनबरोबरील व्यापार कमी होत चालला आहे. पण यामुळे संरक्षणविषयक उपकरणे, मोटारी यांच्यासाठी लागणार्या सेमीकंडक्टरचा आंतरराष्ट्रीय बाजारात मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. ही तैवानसाठी चालून आलेली मोठी संधी ठरते. याचा फायदा घेऊन तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडी मिळविण्यासाठी तसेच राष्ट्रीय सुरक्षेसाठी तैवानने चीनविरोधात उभ्या राहत असलेल्या सेमीकंडक्टरच्या जागतिक पुरवठा साखळीत (ग्लोबल सप्लाई चेन) सहभागी व्हावे, असे आवाहन तैवानमधील विश्लेषकांनी केला आहे.
आतापर्यंत जगभरातील मोटारी तसेच संरक्षणविषयक उपकरणांमध्ये लागणार्या सेमीकंडक्टरच्या निर्यातदार देशांमध्ये अमेरिका व्यतिरिक्त आशिया-प्रशांत क्षेत्रातील चीन, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवान या देशांचा समावेश होता. अमेरिकेतील सेमीकंडक्टर्सच्या क्षेत्रातही चीनची मोठी गुंतवणूक असल्याचा दावा केला जातो. पण वर्षभरापूर्वी हुवेई प्रकरणात चीनवर हेरगिरीचे आरोप झाल्यानंतर चीनच्या सेमीकंडक्टर्सच्या मागणीवर मोठा परिणाम झाला आहे. चीनच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची मागणी देखील घसरत चालली आहे.
त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात सेमीकंडक्टर्सचा जबरदस्त तुटवडा जाणवू लागला आहे. अशा परिस्थितीत सेमीकंडक्टर्सच्या निर्मितीसाठी इतर देश तैवानकडे फार काळ दुर्लक्ष करणार नाहीत, असा दावा तैवानचे व्यापारी प्रतिनिधी जॉन डेंग यांनी केला. ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी लागणारे सेमीकंडक्टर्स तैवान पुरवू शकतो, याकडे डेंग यांनी लक्ष वेधले. यासाठी जानेवारी महिन्यात जर्मनीने तैवानच्या ‘तैवान सेमीकंडक्टर मॅन्यूफॅक्चरिंग कंपनी’ (टीसीएमसी) सोबत सेमीकंडक्टर्सच्या पुरवठ्यासाठी मागणी केली होती. तसेच अमेरिका आणि जपान देखील टीसीएमसीच्या संपर्कात असल्याची आठवण डेंग यांनी करुन दिली.
तर तैवान सरकारशी संलग्न असलेल्या ‘इंस्टिट्युट फॉर नॅशनल डिफेन्स अँड सिक्युरिटी रिसर्च’ या संघटनेतील विश्लेषक वँग चे-जेन यांनी देखील जागतिक पुरवठादार साखळीत तैवानला स्वत:चे वजन वाढविण्यासाठी मोठी संधी असल्याचे म्हटले आहे. सेमीकंडक्टर्स सारखी उत्पादने राजनैतिक, सुरक्षाविषयक आणि सामरिक स्तरावर चिंतेचा विषय बनली आहेत. त्यामुळे आर्थिक आघाडीवर संपन्न देश सेमीकंडक्टर्स निर्मिती करणार्या कंपन्यांना आपल्या देशात प्रकल्प उभारून देत आहेत. या परिस्थितीचा तैवानने फायदा घ्यावा आणि सेमीकंडक्टर्सची निर्यात वाढवावी, असे वँग यांनी सुचविले.
दरम्यान, चीनची हेरगिरी टाळण्यासाठी अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने समविचारी देशांबरोबर सेमीकंडक्टर्सची आघाडी उभारावी, असे आवाहन अमेरिकेतील विश्लेषक करीत आहेत. बायडेन प्रशासन या आघाडीबाबत नेमकी काय भूमिका घेतील, याचे तपशील समोर आलेले नाहीत. पण चीनविरोधातील या आघाडीत तैवानने नक्की सहभागी व्हावे, असे आवाहन वँग करीत आहेत.