तालिबानच्या नेत्यांची इराणशी हातमिळवणी

- अमेरिका-तालिबान शांतीकरार धोक्यात आल्याचे संकेत

हातमिळवणीतेहरान – अफगाणिस्तानातील घडामोडींनी वेगळेच वळण घेतले आहे. गेल्या आठवड्यापर्यंत अमेरिका आणि अफगाणिस्तानशी वाटाघाटी करणार्‍या तालिबानने इराणशी हातमिळवणी केल्याचे दिसत आहे. तालिबानच्या वरिष्ठ कमांडरने नुकताच इराणचा दौरा करून इराणच्या वरिष्ठ नेत्यांशी भेट घेतली. या भेटीनंतर तालिबानचे कमांडर्स अफगाणिस्तानात अमेरिकेबरोबर युद्ध छेडण्यावर दृढ असल्याचे इराणने म्हटले आहे.

अमेरिकेत झालेल्या सत्ताबदलाचे परिणाम अफगाणिस्तानात सुरू असलेल्या तालिबानबरोबरच्या वाटाघाटींवर होतील, असे बोलले जात होते. बायडेन प्रशासनाने देखील तालिबानशी झालेल्या शांतीकराराचे फेरतपासणी करण्यात येईल तसेच अमेरिकेच्या सैन्यमाघारीवर निर्णय घेण्यात येईल, असे म्हटले होते. मात्र, ट्रम्प यांच्या कार्यकाळात अफगाणिस्तानसाठी नियुक्त केलेले विशेषदूत झल्मे खलिलझाद यांना यापुढेही कायम ठेवण्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी जाहीर केले.

या घडामोडींमुळे मंगळवारपर्यंत कतारच्या दोहा येथे अफगाण सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार्‍या तालिबानच्या कमांडर्सनी थेट इराणची वाट धरली आहे. इराण तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानचा वरिष्ठ कमांडर मुल्लाह अब्दुल घनी बरादर याने इराणच्या सर्वोच्च सुरक्षा काऊन्सिलचे प्रमुख अली शामखानी यांची भेट घेतली. बरादर लवकरच इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांची देखील भेट घेणार आहे.हातमिळवणी

बरादर आणि शामखानी यांनी चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना अमेरिका अफगाणिस्तानला युद्धाकडे ढकलत असल्याचा आरोप केला. ‘अमेरिकेची अफगाणिस्तानातील धोरणे या देशाला युद्धात ओढणारी आहेत. यामुळे अफगाणिस्तानातील वेगवेगळ्या गटांमध्ये रक्तपात माजू शकतो’, असा आरोप शामखानी यांनी केला. अफगाणिस्तानातील असुरक्षितता व अस्थैर्यासाठी अमेरिका विनाकारण तालिबानला जबाबदार धरत असल्याचेही शामखानी म्हणाले.

तर तालिबानचे कमांडर्स अमेरिकेशी युद्ध छेडण्यावर दृढ असल्याचे बरादर याच्याबरोबर झालेल्या चर्चेतून उघड झाल्याचे शामखानी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले. बरादरने ग्वांतानामो बे कारागृहात अमेरिकेच्या कैदेत १३ वर्षे शिक्षा भोगल्याची आठवण शामखानी यांनी करून दिली. त्याचबरोबर बरादार याच्यात आजही अमेरिकाविरोधी संघर्षात सहभागी होण्याची इच्छा असल्याचे शामखानी यांनी स्पष्ट केले.

तालिबानचा कमांडर बरादर याने अमेरिकेवर फार विश्‍वास ठेवता येणार नसल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने तालिबानबरोबरच्या कराराचे उल्लंघन केले असून यापुढे अमेरिकेच्या जवानांविरोधी संघर्ष सुरू राहणार असल्याचा इशारा बरादर याने यावेळी दिला.

दरम्यान, बरादर याच्याबरोबर झालेल्या भेटीनंतर शामखानी यांनी तालिबानच्या नेत्यांबरोबर इराणच्या भेटीगाठी सुरूच असतात, अशी माहिती दिली. इराण तालिबान आणि अल कायदाच्या दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचा आरोप अमेरिकेने याआधी केला होता. दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकेचे तेव्हाचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी इराणने अल कायदाशी संधान साधल्याचा ठपका ठेवला होता. तेव्हा इराणने आपल्यावरील हे आरोप फेटाळले होते. पण बरादरच्या दौर्‍यानंतर इराण व तालिबानमधील सहकार्य उघड झाले आहेत.

leave a reply