एलएसीवरील तणाव निवळला, पण समस्या सुटलेली नाही

- लष्करप्रमुख जनरल नरवणे

नवी दिल्ली – लडाखच्या एलएसीवरील तणावावर निघालेला तोडगा दोन्ही देशांचे समाधान करणारा आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी म्हटले आहे. मात्र लडाखच्या एलएसीवरील तणाव पूर्णपणे संपलेला नाही, अजूनही या आघाडीवर बरेच काही साध्य करायचे आहे, याचीही जाणीव लष्करप्रमुखांनी करून दिली. भारतीय लष्कर एकाच वेळी चीन व पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांसह अंतर्गत पातळीवर होणार्‍या युद्धासाठीही सज्ज आहे, असे जनरल नरवणे यांनी स्पष्ट केले. भारताचे लष्करप्रमुख एलएसीवरील स्थितीवर समाधान व्यक्त करीत असले, तरी चीन मात्र गलवान खोर्‍यातील संघर्षावर प्रश्‍न उपस्थित करणार्‍या आपल्या नागरिकांना तुरुंगात डांबत असल्याच्या बातम्या येत आहेत.

यासाठी लष्कराचे धोरण तयार आहे, मात्र याबाबचे डावपेच जगजाहीर करता येणार नाहीत, असे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले. मात्र लडाखच्या एलएसीवर तणाव कमी होत असताना देखील लष्कर अत्यंत सावध असल्याची जाणीव जनरल नरवणे यांनी करून दिली. लष्कराने एकाच वेळी चीन व पाकिस्तान आणि अंतर्गत पातळीवरील सुरक्षाविषयक आव्हानांना तोंड देण्याची तयारी केलेली आहे. या २.५ अर्थात अडीच आघाड्यांवरील युद्धासाठी लष्कर तयार आहे, अशी ग्वाही जनरल नरवणे यांनी दिली.

लष्करप्रमुखांनी लडाखच्या एलएसीवरील तणाव निवळत चालल्याचे जाहीर केले असले, तरी चीनसमोर निराळीच समस्या खडी ठाकल्याचे दिसत आहे. गेल्या आठ महिन्यांहून अधिक काळ चीनने लडाखच्या एलएसीवर आपले हजारो जवान तैनात ठेवले होते. लडाखच्या हिवाळ्यात कुडकुडून आपले जवान गारठल्यानंतरही, चीनने इथून माघार घेतली नव्हती. भारतासमोर चीनचे लष्कर टिकाव धरू शकले नाही, हा संदेश या निमित्ताने सार्‍या जगाला मिळेल, या भीतीने चीनला ग्रासले होते. म्हणूनच चीनने इथून माघार घेतली नव्हती. आधी भारताने माघार घ्यावी, असा चीनचा हट्ट होता. अखेरीस चीनला भारताच्या निर्धारसमोर झुकावे लागले आणि चीनने लडाखच्या एलएसीवरून लष्कर मागे घेतले. त्याचवेळी भारतीय सैन्याबरोबरील गलवान खोर्‍यात झालेल्या चकमकीत आपले पाच जवान ठार झाल्याचे चीनला मान्य करावे लागले. तसे करीत असताना चीनने काही व्हिडिओज् देखील प्रसिद्ध केले.

ही माहिती उघड करणे चीनला महाग पडू लागल्याचे संकेत मिळत आहेत. चीनच्या सोशल मीडियावर याचे पडसाद उमटू लागले असून बर्‍याचजणांनी भारताच्या विरोधात विद्वेषी प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. मात्र काही चिनी नेटकरांनी गलवानमधील संघर्षाबाबत आपल्या देशाच्या यंत्रणांना अडचणीत टाकणारे प्रश्‍न विचारले. चीनचा शोधपत्रकार व ब्लॉगर असलेल्या क्यू झिमिंग याने गलवानच्या संघर्षात ठार झालेल्या जवानांची माहिती उघड करण्यासाठी इतका वेळ का घेतला? असा प्रश्‍न चिनी अधिकार्‍यांना विचारला. भारताने या संघर्षात आपले २० सैनिक गमावल्याचे मान्य केले आहे. मग ठार झालेल्या चिनी जवानांची संख्या इतकी कमी कशी? असा खोचक प्रश्‍नही झिमिंग याने केला.

प्रश्‍नांची उत्तरे देण्याची सवय नसलेल्या चिनी यंत्रणांनी झिमिंग याला ताब्यात घेतले आहे. असे प्रश्‍न विचारण्याची आगळीक केल्याबद्दल त्याला दहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असे दावे केले जातात. अशाच आणखी पाच चिनी नेटकरांना ताब्यात घेण्यात आले आहे. ठार झालेले जवान आणि चिनी नायकांची अप्रतिष्ठा केल्याच्या आरोपाखाली ही अटक झाल्याचे सांगितले जाते. त्यांना तीन वर्षाचा तुरुंगवास सहन करावा लागू शकतो. याबरोबरच १९ वर्षाच्या अनिवासी चिनी तरुणाचे सोशल मीडियावरील खाते बंद करण्यात आले आहे. गलवानच्या खोर्‍यातील संघर्षात आलेले अपयश तसेच लडाखच्या एलएसीवरची माघार, हे सारे दडपण्यासाठी चीन ही कारवाई करीत आहे.

चीनच्या सरकारकडून सांगितल्या जाणार्‍या गोष्टींवर प्रश्‍न उपस्थित करायचा नाही, ते नमूटपणे ऐेकून तेच सत्य आहे, हे मान्य केल्यावाचून तुमच्यासमोर दुसरा पर्याय नाही, असा संदेश चीनची राजवट देत आहे.

leave a reply