सौदीच्या इंधनप्रकल्पांवरील हौथींच्या हल्ल्यानंतर आखातातील तणाव वाढला

दुबई – येमेनच्या हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या रियाधमधील इंधनप्रकल्पावर चढविलेल्या हल्ल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटले आहेत. अमेरिकेने देखील शुक्रवारी हौथी बंडखोरांनी चढविलेल्या या हल्ल्याचा निषेध केला आहे. तर सौदीवर होत असलेल्या या हल्ल्यांमागे इराणचा हात असल्याचा आरोप सौदीचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री अदेल अल-जुबैर यांनी केला. गल्फ कोऑपरेशन कौन्सिल-जीसीसीने सौदीवरील या हल्ल्याची निर्भत्सना करून आंतरराष्ट्रीय समुदायाने याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली. मात्र अमेरिकेने दहशतवाद्यांच्या यादीतून वगळलेल्या हौथी बंडखोरांचा आत्मविश्‍वास कमालीचा वाढला असून सौदीवरील त्यांचे हल्ले थांबणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत.

‘सौदीवरील हल्ल्याची जबाबदारी हौथी बंडखोरांनी स्वीकारलेली आहे. ही अत्यंत गंभीर बाब ठरते’, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या उपप्रवक्त्या जेलिना पॉर्टर यांनी म्हटले आहे. ‘सौदीच्या इंधनप्रकल्पांना लक्ष्य करून त्याद्वारे इंधनाचा जागतिक पुरवठा बाधित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या इंधनप्रकल्पात काम करीत असलेले तसेच आजूबाजूच्या नागरिकांची सुरक्षा धोक्यात आणणारे हे हल्ले चिंताजनक ठरतात’, असे पॉर्टर म्हणाल्या.

ही चिंता अमेरिकेकडून व्यक्त करण्यात येत असली, तरी या हल्ल्यानंतर हौथींवर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याचे संकेत अमेरिकेने दिलेले नाहीत. बायडेन यांच्या प्रशासनाने अमेरिकेची सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर, हौथी बंडखोरांना दहशतवाद्यांच्या यादीतून वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. यानंतर हौथी बंडखोरांच्या सौदीवरील हल्ल्यात वाढ झाल्याचे दिसत आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर ज्यो बायडेन यांनी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी चर्चा न करण्याचा निर्णय घेतला होता. सौदीचे राजे सलमान यांच्याशीही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी खूप उशीराने चर्चा केली होती. याद्वारे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सौदीला इशारे दिल्याची चर्चा सुरू झाली होती.

हौथी बंडखोरांच्या बाबतीत बायडेन यांचे प्रशासन स्वीकारीत असलेले सौम्य धोरण सौदीला धक्का देण्यासाठीच असल्याचे बोलले जात आहे. क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या आदेशानेच सौदीचे पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या झाल्याचे अहवाल प्रसिद्ध झाले होते. लवकरच बायडेन यांचे प्रशासन यावरून सौदीच्या प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना लक्ष्य करणार असल्याचे दावे केले जात आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर, हौथी बंडखोरांविरोधात अमेरिकेने स्वीकारलेली सौम्य भूमिका, हा बायडेन प्रशासनाच्या सौदीविरोधी राजकारणाचा भाग ठरत असल्याचे दिसते.

या हल्ल्यांच्या विरोधात सौदी व सौदीसमर्थक देशांनी एकजूट केली आहे. २०१५ साली सौदीने येमेनवर हल्ला चढविला होता. मुहम्मद अली अल-हौथी यांच्या समर्थकांनी येमेनचा ताबा घेतल्यानंतर सौदी व मित्रदेशांच्या आघाडीने हे हल्ले सुरू केले होते. त्यानंतर आत्तापर्यंत सुरू असलेल्या या संघर्षात एक लाख, ३० हजार जण ठार झाले असून यात १२ हजार नागरिकांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. या संघर्षामुळे येमेनवर भयंकर मानवी आपत्ती कोसळली आहे. सौदी व मित्रदेशांच्या या हल्ल्यांविरोधात हौथी बंडखोरांना इराणकडून सहाय्य मिळत आहे. त्यामुळे सौदी व सौदीप्रणित आघाडीचा हौथींविरोधातील हा संघर्ष म्हणजे सौदी व इराणमधील अप्रत्यक्ष लढाई असल्याचे समोर येत आहे.

अमेरिकेत झालेल्या सत्ताबदलानंतर इराण व हौथींची ताकद प्रचंड प्रमाणात वाढली आहे. येमेनवर हल्ले चढविणार्‍या सौदीला अत्याधुनिक शस्त्रे पुरविण्यास अमेरिकेने नकार दिला आहे. त्याचवेळी हौथींना दहशतवाद्यांच्या यादीतून काढून बायडेन प्रशासनाने आपण सौदीच्या बाजूने नाहीत, हे दाखवून दिले आहे. अशा परिस्थितीत सौदी व मित्रदेशांच्या आघाडीकडून हौथींच्या या हल्ल्यावर कोणती प्रतिक्रिया उमटते, याकडे सार्‍या जगाचे लक्ष लागलेले आहे. कारण सौदीच्या इंधनप्रकल्पांवर अशारितीने हल्ले होत राहिले, तर त्याचा फार मोठा परिणाम इंधनाच्या दरावर होऊ शकतो.

leave a reply