रशियाच्या मुद्यावरून पोलंड व हंगेरीमध्ये तणाव

- पोलंडच्या उपपंतप्रधानांची हंगेरीवर टीका

वॉर्सा/बुडापेस्ट – हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन रशियासंबंधातील भूमिका जोपर्यंत बदलत नाहीत तोपर्यंत पोलंड व हंगेरीमध्ये पूर्वीप्रमाणे चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकत नाहीत, असा इशारा पोलंडचे उपपंतप्रधान जारोस्लाव काझिन्स्की यांनी दिला. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पोलंडने रशियाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचवेळी दुसर्‍या बाजूला हंगेरीने रशियाला विरोध करणे टाळले असून इंधनविषयक सहकार्य कायम ठेवण्याची ग्वाही दिली आहे. या परस्परविरोधी भूमिकांमुळे दोन देशांमध्ये तणाव निर्माण झाला असून हा तणाव पुढेही कायम राहिल, असे संकेत मिळत आहेत.

पोलंड व हंगेरीमध्ये तणाव‘रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याविरोधात कठोर भूमिका घेण्याचे ऑर्बन टाळत आहेत. ऑर्बन यांच्या या नकाराबाबत माझी भूमिका अतिशय नकारात्मक आहे. बुचामध्ये काय घडले हे मला दिसलेले नाही, असे ऑर्बन म्हणतात. असे असेल तर त्यांना डोळ्यांच्या डॉक्टरची गरज आहे, असे मला वाटते. ऑर्बन यांनी त्यांच्या विजयानंतर पोलंडबरोबर चांगले संबंध हवे असल्याचे म्हटले आहे. ऑर्बन यांची रशियाबाबतची भूमिका बदलली तरच हे शक्य आहे. मात्र त्यात बदल झाला नाही तर पोलंड व हंगेरीमध्ये पूर्वीप्रमाणे संबंध राखणे शक्य नाही’, असा इशारा पोलंडचे उपपंतप्रधान जारोस्लाव काझिन्स्की यांनी दिला.

पोलंड व हंगेरीमध्ये तणावकाही दिवसांपूर्वी पोलंडचे पंतप्रधान मॅत्युस्झ मोराविकी यांनीही हंगेरीला लक्ष्य केले होते. हंगेरी रशियाच्या कलाने भूमिका घेत असून तो रशियाबरोबरील संबंध कधीच तोडणार नाही, असे मोराविकी यांनी बजावले होते. रशियावरील निर्बंधांना विरोध करण्यात हंगेरी आघाडीवर असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वी हंगेरी व पोलंड हे देश युरोपिय महासंघातील परस्परांशी जवळीक असणारे देश म्हणून ओळखण्यात येत होते. या देशांनी युरोपिय महासंघाच्या काही निर्णयांविरोधात आक्रमक भूमिकाही घेतली होती.

दरम्यान, युरोपिय महासंघ हा नाटोचे आर्थिक संबंध हाताळणारा विभाग बनल्याची टीका रशियाच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मारिआ झाखारोव्हा यांनी केली आहे. महासंघाचे परराष्ट्र प्रमुख व इतर अधिकार्‍यांनी युक्रेन संघर्षाबाबत केलेल्या वक्तव्यांवरून झाखारोव्हा यांनी हा टोला लगावला आहे.

leave a reply